
नाशिक,सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याचा ३० ऑक्टोबरला ग्रामपरिक्रमेने शुभारंभ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील रामकुंड परिसरात ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार असून, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर महाध्वजारोहण आणि गोदाआरती संपन्न होणार आहे.
या मुख्य सोहळ्यास महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी तसेच विविध आखाड्यांचे प्रमुख श्रीमहंत उपस्थित राहणार असल्याची माहिती कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सिंहस्थ समितीचे विश्वस्त सतीश शुक्ल आणि आखाडा परिषदेचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी दिली.
३० ऑक्टोबर रोजी ग्रामपरिक्रमेने या तीन दिवसीय सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी मुख्य महाध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक परंपरेला अनुसरून होणाऱ्या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी सामूहिक शंखनादाचा कार्यक्रम होणार असून, त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे प्रमाणपत्र ध्वजारोहण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
याशिवाय सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण, कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन असे कार्यक्रमही होणार आहेत. सायंकाळी गोदावरी नदीची आरती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे धार्मिक वातावरण अधिक मंगलमय होणार आहे.
३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याकडे भाविकांचे लक्ष लागले असून, ३१ ऑक्टोबर रोजी होणारे महाध्वजारोहण आणि गोदाआरती हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.




