वीज तुटवड्यामुळे राज्यात भारनियमन; वाढत्या तापमानामुळे मागणीत प्रचंड वाढ!

पुणे : ‘एल निनो’मुळे झालेली तापमानवाढ वीजपुरवठ्याच्या मुळावर आली आहे. विजेच्या वाढलेल्या मागणीच्या तुलनेत उपलब्ध वीज कमी पडत असल्याने महावितरणला राज्यात भारनियमन करण्याची वेळ आली आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्यात भारनियमन होत असल्याचे उघड झाले असून, गेल्या काही वर्षांमध्ये प्रथमच असे झाले आहे.

महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राने (एसएलडीसी) किती भारनियमन झाले, याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार, राज्यभरात गेल्या शनिवारपासून (३ ऑक्टोबर) जास्त मागणी असलेल्या संध्याकाळच्या वेळात भारनियमन करण्यात येत आहे. गेल्या बुधवारपासून (७ ऑक्टोबर) सायंकाळबरोबरच सकाळी सहा व सातलाही भारनियमन करण्यात आले, तर शनिवारी, सुमारे ७५० मेगावॉट तुटीमुळे भारनियमन झाले. त्यात वाढ होऊन गुरुवारी (८ ऑक्टोबर) वीजतूट एक हजार मेगावॉटहून अधिक, तर शुक्रवारी (९ ऑक्टोबर) १८०० मेगावॉटहून अधिक होती.

राज्यातील दररोजची विजेची मागणी सुमारे ३० हजार मेगावॉटवर पोहोचली आहे. त्यातील सुमारे २५ हजार मेगावॉट विजेची मागणी ‘महावितरण’च्या ग्राहकांकडून, तर सुमारे ४ हजार मेगावॉट विजेची मागणी मुंबईतील ग्राहकांकडून आहे. मात्र, मुंबईत भारनियमन करण्यात येत नाही. तिथे वीजपुरवठा करणार्‍या अदानी, बेस्ट, टाटा या कंपन्यांना महावितरणकडून अतिरिक्त विजेचा पुरवठा करण्यात येतो. गरज पडल्यास मुंबईत वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणला दरवर्षी सुरक्षा ठेव रक्कमही या कंपन्यांकडून देण्यात येते.

विजेची मागणी (मेगावॉटमध्ये)

दिनांक – महावितरण मुंबई महाराष्ट्र
३ ऑक्टोबर २६,६०९ ३,८७६ ३१,१०९
४ ऑक्टोबर २६,०८९ ३,३२३ २९,९२७
५ ऑक्टोबर २७,२२६ ४,१२२ ३२,००७
६ ऑक्टोबर २६,२९८ ४,१४८ ३१,०९५
७ ऑक्टोबर २७,५९३ ४,३०३ ३२,५०७
८ ऑक्टोबर २७,३८२ ४,३२९ ३२,३८९
९ ऑक्टोबर २७,४९६ ४,३८८ ३२,५०९
१० ऑक्टोबर २८,२२१ ४,१२५ ३२,९२१
११ ऑक्टोबर २६,९०२ ३,६११ ३०,८९३
एल-निनो आणि ऑक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. तीन-चार दिवसांत ही मागणी दोन हजार मेगावॉटने वाढली. ही वाढ जशी घरगुती ग्राहकांबाबतीत आहे, तशीच कृषी क्षेत्रातूनसुद्धा आहे. भारनियमन करावे लागणार नाही, असाच प्रयत्न आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजना वेळीच राबवली नसती, तर राज्याची स्थिती निश्चितच अडचणीची झाली असती. – लोकेश चंद्र, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण

सध्या भारनियमन करण्यात येत आहे, तर त्याची माहिती जाहीर करायला हवी होती. येत्या उन्हाळ्यात भारनियमनाचा कालावधी आणखी वाढू शकतो. महावितरणने अधिक वीज मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वीज नियामक आयोगानेही कमाल मागणीच्या काळातील भार इतर वेळेत कसा वळवता येईल, याचा विचार करावा. – जयंत देव, माजी सदस्य, राज्य वीज नियामक आयोग

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button