
“वर्षभर शांततेचा भंग करता येणार नाही”; कोर्टाच्या अटीवर दिपके, दास आणि रांका यांची २४ तासांनी सशर्त सुटका
- कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना एका वर्षासाठी ‘शांतता भंग’ न करण्याच्या अटीवर रविवारी कार्यकारी न्यायदंडाधिकार्यांनी सोडले, अशी माहिती पक्षाच्या कायदेशीर बाबींच्या प्रमुख रत्ना सिंग यांनी दिली.
शनिवारी जंतरमंतर येथे सीजेपीने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या तिघांना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली होती.
दरम्यान, आता आंदोलन पुढे होणार की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर, दुपारी २ वाजता हे तिघेही संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आशुतोष रांका यांनी दिली.
पोलीस काय म्हणाले?
अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना १० ऑक्टोबर रोजी बीएनएसएसच्या कलम १२६/१७० अन्वये प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली होती. सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन करून, त्यांना आज दिल्ली कँट येथील एसईएम न्यायालयात हजर करण्यात आले. एक वर्षाच्या कालावधीसाठी शांतता आणि चांगल्या वर्तणुकीची हमी म्हणून ५० हजार रुपयांचा जामीन अर्ज भरण्यात आला आणि एसईएम न्यायालयाने त्यांची सुटका केली, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
मतदार यादीच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ प्रक्रियेतील कथित गैरव्यवहारावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी सीजेपी आणि विरोधी पक्षांनी केली आहे. या मागणीसाठी दिल्लीसह विविध राज्यात आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनाकरता दिल्लीत जाणाऱ्या सीजेपीच्या नेत्यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं होतं. गेल्या २४ तासांपासून ते कुठे होते, याबाबतची कोणतीच माहिती माध्यमांना देण्यात आली नव्हती. त्यानंतर रविवारी सकाळी ते प्रतिबंधांत्मक अटकेत असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, त्यांना आज विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यासंमोर हजर करण्यात आले. त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी शांतता राखण्याची अट घालण्यात आली असून ५० हजार रुपयांचा जामीन अर्जही भरण्याचे सूचित करण्यात आले आहे.
तसंच, २४ तासांनी सुटका होताच अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. त्यांनी पोस्ट करत म्हटलं, ‘पंतप्रधान म्हणून मोदींनी लाज आणली आहे. या देशाने यापूर्वी कधीही इतका मोठा भ्याड आणि जुलमी माणूस पाहिला नाही.’




