आंजणारीत शिकारीच्या तयारीत असलेल्या दोघांना लांजा पोलिसांनी पकडले

१२ बोअर बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि टॉर्चसह १० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

लांजा : जंगली प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी झाडीझुडपांत दबा धरून बसलेल्या दोघांना लांजा पोलिसांनी पकडले. शनिवारी रात्री १.५५ वाजण्याच्या सुमारास आंजणारी-शिरंबवली रस्त्यावरील ओवलाचा दांडा परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी संशयितांकडून १२ बोअरची बंदूक, चार जिवंत काडतुसे आणि टॉर्च असा एकूण १० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री लांजा पोलीस पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी आंजणारी-शिरंबवली रस्त्यालगत ओवलाचा दांडा येथे झाडीझुडपांमध्ये दोघे संशयास्पदरीत्या दबा धरून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे बंदूक आणि जिवंत काडतुसे आढळून आली.
दीपक वसंत पाष्टे (वय ३३, रा. पाष्टेवाडी, आंजणारी) आणि सुदर्शन श्रीकांत सावंत (वय ३५, रा. कशेळी, नाणीज, ता. रत्नागिरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
बंदूक, काडतुसे आणि टॉर्च जप्त
पोलिसांनी संशयितांकडून १० हजार रुपये किमतीची १२ बोअरची बंदूक, ४०० रुपये किमतीची चार जिवंत काडतुसे आणि ५०० रुपये किमतीचा टॉर्च असा एकूण १० हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जंगली प्राण्यांच्या शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी दीपक पाष्टे आणि सुदर्शन सावंत यांच्याविरोधात भारतीय हत्यार अधिनियम १९५२ चे कलम ३(१), २५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास जाधव करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button