
पावसासाठी भू येथील सिद्धेश्वर मंदिरात २६ वर्षांनंतर जलाधिवास विधी!
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे ग्रामस्थांचा पारंपरिक धार्मिक विधी; तळीतील पाणी आटल्याने नदीतून पाणी आणण्याची वेळ

राजापूर : निसर्गाने पाठ फिरवल्याने यंदा पावसाने दिलेली ओढ, भातशेतीसह बागायती पिकांवर ओढवलेले संकट आणि आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती, अशा दुष्काळसदृश परिस्थितीत पाऊस पुन्हा बरसावा आणि सर्वांचे कल्याण व्हावे, या श्रद्धेतून राजापूर तालुक्यातील भू येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात पारंपरिक जलाधिवास विधी भक्तिभावाने पार पडला. यापूर्वी १९७९ आणि २००० मध्ये हा विधी करण्यात आला होता. तब्बल २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा हा धार्मिक विधी झाल्याने परिसरात त्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, विधी पूर्ण झाल्यानंतर भू आणि खिणगिणी परिसरात तुरळक पाऊस झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने शेती आणि बागायती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी भातशेतीचे नुकसान होत असून, आगामी काळात पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल की नाही, याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या संकटातून मार्ग निघावा, निसर्गाची कृपा पुन्हा व्हावी आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, या भावनेतून भू येथील श्री देव लक्ष्मीकांत कार्तिकोत्सव ब्रह्मवृंद मंडळाने श्री देव सिद्धेश्वरावर जलाभिषेक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंदिरात पारंपरिक जलाधिवास विधी पार पडला.
गाभाऱ्यातील शिवपिंडी पूर्णपणे पाण्याखाली
जलाधिवास हा देवतेला पाण्यात ठेवण्याचा पारंपरिक धार्मिक विधी आहे. या विधीमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंडी पूर्णपणे पाण्याखाली जाईपर्यंत पाणी भरले जाते. गाभाऱ्यात पाणी साठवताना ज्या ठिकाणी गळती होते, त्या ठिकाणी वारुळाची माती वापरून पाणी टिकवण्याचा प्रयत्न केला जातो.
यापूर्वी झालेल्या जलाधिवास विधींच्या वेळी मंदिरातील तळीचे पाणी कधीही पूर्णपणे आटले नव्हते. त्यामुळे गाभाऱ्यात आवश्यक तेवढे पाणी भरण्यात अडचण आली नव्हती. मात्र, यंदा पाण्याची कमतरता इतकी तीव्र आहे की, मंदिरातील तळीतील पाणी विधीसाठी वापरणेही शक्य झाले नाही. तळीतील पाणी आटल्याने अखेर नदीतून पाणी आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.
यावेळी ग्रामस्थांनी मानवी साखळी तयार करून नदीतील पाणी मंदिरापर्यंत पोहोचवले. त्यानंतर गाभाऱ्यात पाणी भरून शिवपिंडी पूर्णपणे पाण्याखाली जाईपर्यंत विधी करण्यात आला. पाणीटंचाईची गंभीरता अधोरेखित करणारी ही परिस्थिती ग्रामस्थांसाठी चिंतेचा विषय ठरली.
समाजकल्याणाच्या भावनेतून ब्रह्मवृंदांचा पुढाकार
भू येथील श्री देव लक्ष्मीकांत कार्तिकोत्सव ब्रह्मवृंद मंडळ धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक अडचणी सोडवण्यासाठी तसेच गावातील नागरिकांच्या सुख-दुःखाच्या प्रसंगी मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेत असते. पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन पावसाचे पाणी साठवता यावे, यासाठी मंडळाच्या वतीने दरवर्षी पाच ते सहा बंधारे बांधण्याचे कामही केले जाते.
यंदा मात्र पावसाने दडी मारल्याने पाणी साठवण्याच्या प्रयत्नांनाही मर्यादा आल्या आहेत. अशा परिस्थितीत केवळ धार्मिक परंपरा म्हणून नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या कल्याणाची भावना मनात ठेवून जलाधिवास विधी करण्यात आला. या विधीसाठी सुमारे २० ब्रह्मवृंद उपस्थित होते.
विधीनंतर तुरळक पाऊस; ग्रामस्थांच्या आशा पल्लवित
जलाधिवास विधी पूर्ण झाल्यानंतर भू आणि खिणगिणी परिसरात तुरळक पाऊस झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी हा अनुभव दिलासादायक ठरला. मात्र, परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी आणि शेतीला नवसंजीवनी मिळण्यासाठी पुरेशा पावसाची आवश्यकता आहे.
श्रद्धा, परंपरा आणि समाजकल्याणाची भावना यांचा संगम असलेल्या या जलाधिवास विधीतून ग्रामस्थांनी पावसासाठी आर्त साद घातली आहे. वरुणराजाने कृपा करावी, नद्या-नाले आणि जलस्रोत पुन्हा भरून यावेत, शेतीला संजीवनी मिळावी आणि नागरिकांवरील पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे, अशी अपेक्षा परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.




