राजापूर शहरासाठी अडीच कोटींचा पाणीटंचाई कृती आराखडा! नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांची माहिती; पाण्याचा जपून वापर करण्याचे नागरिकांना आवाहन


राजापूर : यंदा कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शासनाने राजापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश केला आहे. या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि आगामी उन्हाळ्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राजापूर नगरपरिषदेने आतापासूनच उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून शहरवासीयांना पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत, यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी दिली.
संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता नगरपरिषदेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा. प्रशासन आणि नागरिकांनी सामूहिक प्रयत्न केल्यास या संकटावर मात करणे शक्य होईल, असे आवाहनही त्यांनी केले.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी वाहिनी बदलली
कोंढेतड परिसरातील पाणीपुरवठा वाहिनीला गळती लागल्याने या भागातील तसेच शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. याची तातडीने दखल घेत संबंधित ठिकाणची पाणीपुरवठा वाहिनी बदलण्यात आली आहे. त्यामुळे कोंढेतड परिसरासह शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे नगराध्यक्षा खलिफे यांनी सांगितले.
वनराई बंधारे, विहिरींची स्वच्छता आणि टँकरचे नियोजन
संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोदवली धरण आणि शिळ जॅकवेल परिसरात दोन मोठे, तर अर्जुना व कोदवली नदीपात्रात १५ वनराई बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उपलब्ध पाणीसाठा वाढविण्यास मदत होणार आहे. याशिवाय शहरातील पाणीवितरण व्यवस्थेतील गळती रोखणे, सार्वजनिक तसेच खासगी विहिरींची स्वच्छता करणे, शिळ जॅकवेलकडील रखडलेले स्वतंत्र वीजवाहिनीचे काम पूर्ण करून घेणे आणि जनरेटर खरेदी करणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत.
पाणीटंचाई तीव्र झाल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीही नियोजन करण्यात येत आहे. परिस्थितीनुसार आवश्यक असलेल्या अन्य उपाययोजनाही प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोदवली धरणातील पाणीसाठा वाढविण्यावर भर
कोदवली धरणात जास्तीत जास्त पाणीसाठा उपलब्ध व्हावा, यासाठी नवीन पर्यायी धरणाची झडपे बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. या कामामुळे पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा वाहिन्यांवर विद्युत पंप बसवून पाणी उपसले जात असल्याने पाणीचोरीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही नगराध्यक्षा खलिफे यांनी दिला.
शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न
राजापूर शहरवासीयांना संभाव्य पाणीटंचाईची झळ कमीत कमी बसावी, यासाठी नगरपरिषद प्रयत्नशील आहे. आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करून पाणीटंचाई कृती आराखड्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी केले.
या पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सुबोध पवार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button