दोन अल्पवयीन क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांची पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घेतली भेट

कोळंबे येथील पाणवठ्यात बुडून दोघांचा मृत्यू; दुःखाच्या प्रसंगी कुटुंबीयांचे केले सांत्वन

रत्नागिरी : कोळंबे येथे पाणवठ्यात बुडून दोन १६ वर्षीय क्रिकेटपटूंचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी शुक्रवारी (९ ऑक्टोबर) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन मृत मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

क्रिकेटच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या दोन्ही मुलांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी पोलीस अधीक्षक बगाटे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.

आपल्या मुलांना गमावल्याच्या दुःखाने व्याकूळ झालेल्या कुटुंबीयांना यावेळी अश्रू अनावर झाले. त्यांच्या दुःखात सहभागी होत बगाटे यांनी त्यांना आधार दिला. या भेटीतून पोलीस दलातील कर्तव्यदक्षतेसोबतच माणुसकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडले.

दोन होतकरू क्रिकेटपटूंच्या निधनामुळे क्रीडाप्रेमींसह परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून, या दुर्दैवी घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button