जामदा प्रकल्पाच्या भू-संपादनाला वेग; ७५ हेक्टरची संयुक्त मोजणी पूर्ण


२०२ हेक्टर बुडीत क्षेत्रापैकी मोजणी पूर्ण; २४० सातबारा उताऱ्यांवरील सुमारे २१०० शेतकऱ्यांचा समावेश
काही प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळाल्याने प्रक्रियेला गती; उर्वरित १२७ हेक्टर क्षेत्राच्या मोजणीकडे लक्ष
राजापूर : तालुक्यातील काजिर्डा येथील प्रस्तावित जामदा प्रकल्पाच्या भू-संपादन प्रक्रियेला आता वेग येऊ लागला आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील एकूण २०२ हेक्टरपैकी सुमारे ७५ हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून, या प्रक्रियेत २४० सातबारा उताऱ्यांवरील सुमारे २१०० शेतकऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त मोजणीची प्रक्रिया पुढे सरकण्याबरोबरच काही प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला मिळाल्याने प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला चालना मिळाली आहे.
जामदा प्रकल्पासाठी बुडीत क्षेत्राची संयुक्त मोजणी भूमी अभिलेख विभागाच्या समन्वयाने जलसंपदा, वन, कृषी, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम आदी संबंधित विभागांच्या सहभागातून करण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ७५ हेक्टर क्षेत्राची मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी या क्षेत्राची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
संयुक्त मोजणीचा अहवाल आता भू-संपादन विभागाकडे सादर करण्यात येणार असून, त्यानंतर भू-संपादनाची आवश्यक कार्यवाही पूर्ण करून पुढील प्रक्रिया लघुपाटबंधारे विभाग, चिपळूण यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या नियम व निकषांनुसार संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मोबदला देण्यात येणार आहे. मोजणी पूर्ण झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची संमतीपत्रेही उपलब्ध झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
काही प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप
यापूर्वी मोजणी पूर्ण झालेल्या क्षेत्रासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध झाल्यानंतर काही लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाकडून जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या जामदा प्रकल्पाच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष गती मिळत असल्याचे चित्र आहे.
उर्वरित बुडीत क्षेत्रातील जमिनीची संयुक्त मोजणीही टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काळात भू-संपादनाची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुनर्वसनासाठी ५९ हेक्टर क्षेत्राचे प्रस्ताव
जामदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जलसंपदा विभागामार्फत कार्यवाही सुरू आहे. मौजे मूर या महसुली गावातील ‘मूर पुनर्वसन सांडवा’ या प्रस्तावाद्वारे सुमारे ३३ हेक्टर क्षेत्र, तर मौजे काजिर्डा येथील ‘ब्राम्हणखोरे पुनर्वसन गावठाण’ या प्रस्तावाद्वारे सुमारे २६ हेक्टर क्षेत्र, असे एकूण सुमारे ५९ हेक्टर क्षेत्र पुनर्वसनासाठी संपादित करण्यात येत आहे.
यापैकी काही प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित लाभार्थ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या नियमानुसार पुनर्वसनाच्या सोयी-सवलतींसह भूखंड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
उर्वरित १२७ हेक्टरच्या मोजणीकडे लक्ष
जामदा प्रकल्पाच्या २०२ हेक्टर बुडीत क्षेत्रापैकी ७५ हेक्टरची संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याने भू-संपादनाच्या पुढील टप्प्याला चालना मिळाली आहे. काही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मोबदला मिळू लागल्याने प्रकल्पग्रस्तांमध्येही पुढील प्रक्रियेबाबत अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
आता उर्वरित १२७ हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी, त्यानंतरची भू-संपादन कार्यवाही, मोबदला वाटप आणि पुनर्वसनाच्या सुविधा याकडे प्रकल्पग्रस्तांसह संबंधितांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या प्रक्रियेला मोजणी, मोबदला वाटप आणि पुनर्वसनाच्या कार्यवाहीमुळे टप्प्याटप्प्याने गती मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button