
ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिलेदारावर झाडल्या गोळ्या, प्रदीप पूर्णेकरांची हत्या
मंगळवारी रात्री ठाणे शहरात एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला.
या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रदीप पूर्णेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांचा गराडा असताना घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून मानपाडा परिसरात दहशतीचं सावट पसरलं आहे.
नेमका कसा घडला हल्ला?
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी प्रदीप पूर्णेकर हे मानपाडा येथील गणेश नगर परिसरात असलेल्या आपल्या कार्यालयात उपस्थित होते. यावेळी कार्यालयात इतरही काही कार्यकर्ते उपस्थित होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास स्कूटरवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी थेट त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्या दिशेने लागोपाठ ४ राऊंड फायर केले.यातील दोन गोळ्या थेट प्रदीप पूर्णेकर यांच्या छातीत लागल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूर्णेकर यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र, छातीत गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस तपासाला वेग; हल्लेखोरांचा शोध सुरू
घटनेची माहिती मिळताच ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी मानपाडा आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज हस्तगत करण्यास सुरुवात केली आहे. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोर कैद झाले आहेत. तोंडाला रुमाल बांधून हे हल्लेखोर प्रदीप पूर्णेकर यांच्या ऑफिसजवळ येताना दिसून आले आहेत. रात्री उशिरा नाकाबंदी करत पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला आहे.निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि एकजण अनोळखी असे एकूण 5 संशयित आरोपी आहेत. यामधील पप्या शिंदे, आकाश निमसे यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी मारण्याची धमकी दिली होती. राजेंद्र शिंदे यांनी मिटिंग घेऊन हे सर्व केले, असा आरोप प्रदीप पुर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर यांनी केला आहे. आता ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली आहे की यामागे काही वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारण आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.




