रत्नागिरी स्वच्छ ठेवणाऱ्या कष्टकरी हातांना गणेशोत्सवाची प्रेमाची भेट!


वर्षाताई ढेकणे व दादा ढेकणे यांच्या पुढाकारातून नगरपरिषदेतील सर्व कामगारांना गणेशोत्सव किटचे वाटप


रत्नागिरी : गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू असतानाच रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या नगरपरिषद कामगारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. नगरपरिषदेतील कंत्राटी तसेच कायमस्वरूपी कामगारांना गणेशोत्सवानिमित्त गणेशोत्सव किटची प्रेमाची भेट देत त्यांच्या कष्टांचा सन्मान करण्यात आला.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. नगरपरिषदेच्या स्वच्छता, बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिला व पुरुष कामगारांना गणेशोत्सव किटचे वाटप करण्यात आले.

शहराची स्वच्छता असो, पाणीपुरवठा असो किंवा सार्वजनिक ठिकाणांची देखभाल—नागरिकांच्या दैनंदिन सुविधांसाठी हे कामगार सातत्याने झटत असतात. त्यांच्या मेहनतीमुळेच रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यास मोठी मदत होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदात या कष्टकरी हातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला.

गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वीच गणेशोत्सव किटची भेट मिळाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाबद्दल कामगारांनी वर्षाताई ढेकणे व दादा ढेकणे यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाला भाजपाचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, गटनेते राजू तोडणकर, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेविका मानसी करमरकर, नगरसेवक संदीप सुर्वे आणि नगरसेवक नितीन जाधव यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगरपरिषद कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले. शहराच्या स्वच्छता आणि विकासामध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या कामगारांचा सन्मान करणे ही सामाजिक जबाबदारी असून, गणेशोत्सवाच्या आनंदात त्यांचाही सहभाग असावा, या भावनेतून हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

गणरायाच्या स्वागतापूर्वी कष्टकरी हातांचा सन्मान करत दिलेली ही प्रेमाची भेट आपुलकी, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारी ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button