कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, सरकारकडून टोलमाफी जारी;


कोकणात गणेशोत्सव साजरा करायला जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने गणेशभक्तांसाठी खास गिफ्ट दिले आहेत. गणेशभक्तांच्या कोकण प्रवासासाठी टोलमाफी देण्यात आली आहे. यावर्षी देखील सरकारने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी आणि इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला. ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणाकडे जाणाऱ्या संबंधित मार्गांवरील टोल नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे. याशिवाय नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले हजारो नागरिक गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी कोकणात जात असतात. या काळात मुंबई-गोवा महामार्गासह कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते. गणेशभक्तांचा हा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा, तसेच त्यांना प्रवासादरम्यान अनावश्यक आर्थिक भार सहन करावा लागू नये, यासाठी शासनाने टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने आज टोलमाफीसंदर्भात शासन परिपत्रक जारी केले.

सरकारने घेतलेल्या टोलमाफीच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशभक्तांना टोलमाफीचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्वतंत्र स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाणार आहे. परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, पोलिस विभाग आणि संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या समन्वयातून आवश्यक त्या ठिकाणी हे पास उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button