शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे दहा शिक्षक ‘टीचर एक्सेलेन्स अवॉर्ड २०२६’ पुरस्काराने गौरवान्वित.

रत्नागिरी : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन तर्फे शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी हॉटेल मानस, रत्नागिरी येथे ‘टीचर एक्सेलेन्स अवॉर्ड २०२६’ या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

रत्नागिरी परिसरातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दहा शिक्षकांचा यावेळी ‘वर्षातील उत्कृष्ट शिक्षक २०२६’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे असिस्टंट गव्हर्नर रोटे. अविनाश पालशेतकर यांनी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरीच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ती राजेंद्र गायकवाड, प्राथमिक आश्रमशाळा जावडे, ता. लांजा येथील सहाय्यक शिक्षक श्री. लक्ष्मण मिनिनाथ मिडगुले, पीएमश्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, झरेवाडी, हातखंबा शाळेचे शिक्षक श्री. राजेश जगन्नाथ गोसावी, झरेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विष्णू पांडुरंग पवार, कुवारबाव येथील जागुष्टे हायस्कूलच्या शिक्षिका सौ. सिद्धी गणेश जोशी, कसोप-फणसोप येथील श्री लक्ष्मीकेशव माध्यमिक विद्यालयच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा दिलीप राजेशिर्के, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, जि.प.पूर्ण प्राथमिक कासारवेली शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. ज्योती उदय डोंगरे, निवेंडी येथील केंद्रप्रमुख सौ. अमृता विवेक इनामदार, उद्यमनगर, रत्नागिरी येथील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलच्या शिक्षिका सौ. माधवी मिलिंद करंदीकर आणि माध्यमिक विद्यालय करबुडेचे मुख्याध्यापक श्री. महेंद्र विठोबा कुवळेकर यांचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष रोटे. डॉ. संदीप करे यांनी शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की “प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजाच्या गरजांशी जोडलेले उपक्रम सातत्याने राबवत राहील.” त्याचप्रमाणे पोलिओ निर्मूलनाच्या संदर्भातील रोटरीचे बहुमूल्य योगदान विशद करताना पोलिओ निर्मूलनाचे कार्य प्रभावीपणे पुढे चालू ठेवण्यासाठी निधी उभारण्याच्या दृष्टीने End Polio असा संदेश असणाऱ्या छत्र्या रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन, रत्नागिरीने खरेदी केल्या आणि आजच्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना या छत्र्या भेट म्हणून देताना या माध्यमातून पोलिओ निर्मूलनाचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी क्लबतर्फे छोटासा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी सांगितले.

पुरस्कार स्वीकारताना सन्मानित शिक्षकांनी आपल्या भावना अगदी उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. आपल्या शैक्षणिक कार्याची रोटरी क्लबने घेतलेली दखल आणि केलेला सन्मान हा आपल्यासाठी आनंदाचा आणि प्रेरणेचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक उत्साहाने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारातून मिळाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनने शिक्षकांच्या कार्याचा केलेला आजचा सन्मान ही शिक्षण क्षेत्रासाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आयोजन रोटे. अस्मिता चोप्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. रोटे. डॉ. स्वप्ना करे आणि ॲड. हेमंतकुमार चोप्रा यांनी सूत्रसंचालन केले. क्लबचे सचिव रोटे. सीताराम सावंत आणि खजिनदार रोटे. विनायक निकम यांच्यासह क्लबच्या सर्व सदस्यांनी क्लबचे अध्यक्ष डॉ.संदीप करे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

शिक्षकांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता आणि शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा संदेश देणारा हा हृद्य सोहळा उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button