
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटात जाणार; मातोश्रीवर तातडीची बैठक?
राजकीय वर्तुळातून मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाला पुन्हा मोठा धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून ठाकरे गटातील तब्बल १४ आमदारांना शिवसेना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नवरात्रीपूर्वी या १४ आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईत तातडीची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर दुपारी ही बैठक होणार असून, संभाव्य पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील आमदारांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या मंत्र्यांकडून संबंधित आमदारांशी संपर्क साधला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
यातील सहा आमदारांना सरकारमध्ये महत्त्वाची खाती किंवा मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. काही आमदारांच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी किंवा राज्यमंत्रिपदी नियुक्तीबाबतही पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.दरम्यान, १४ आमदारांच्या संभाव्य पक्षप्रवेशाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली असली, तरी संबंधित आमदारांकडून किंवा दोन्ही पक्षांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही




