सावर्डे पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधन; अजितदादांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन

चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करत सावर्डे येथे रक्षाबंधनाचा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात अजितदादांच्या प्रतिमेला राखी अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या कार्याला आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याला उजाळा दिला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम यांनी अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या कार्याची आठवण सांगितली. “अजितदादांचे अचानक जाणे ही आपल्या सर्वांसाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे. जनतेशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते, विकासाची तळमळ आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी कायम स्मरणात राहील. दादा आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आणि विचार आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील,” अशा भावनिक भावना त्यांनी व्यक्त केल्या.

तसेच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या पाठीशी दादांप्रमाणेच खंबीरपणे उभे राहून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकाऱ्यांनी अजितदादांच्या प्रतिमेला राखी अर्पण करून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी त्यांच्या प्रेमळ स्वभावाची, बहिणींप्रती असलेल्या आपुलकीची आणि आधाराची आठवण काढत महिला पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. अजितदादांच्या आठवणी आणि त्यांचे कार्य सदैव मनात जिवंत राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

दरम्यान, समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ या संकल्पनेतून सावर्डे पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा उपक्रम राबविण्यात आला. सौ. पूजा शेखर निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

सावर्डे पोलीस ठाण्याचे अधिकारी आबासो पाटील तसेच उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. कुटुंबापासून दूर राहून दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांच्या सेवेला यावेळी सलाम करण्यात आला.

“रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर समाजाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पोलीस बांधव आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना राखी बांधून त्यांच्या सेवेला सलाम करण्याची संधी मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सौ. पूजा शेखर निकम यांनी सांगितले.

या प्रसंगी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा शेखर निकम, चिपळूण नगरपरिषदेचे नगरसेवक योगेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावर्डे विभागातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button