
धावत्या एसटी बसवर विद्युतवाहिनी कोसळली; महिला वाहकाला विजेचा धक्का
संगमेश्वरातील फणसवणे-उमरे फाट्यावरील घटना; चालकासह प्रवासी बचावला, मोठा अनर्थ टळला
संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या धावत्या एसटी बसवर विद्युतवाहिनी कोसळल्याची थरारक घटना आज (२६ ऑगस्ट) सकाळी फणसवणे-उमरे फाट्यावर घडली. विद्युतवाहिनी बसच्या संपर्कात आल्याने वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा धक्का बसून किरकोळ दुखापत झाली. चालक रवींद्र साप्ते यांनी प्रसंगावधान राखल्याने ते सुरक्षित राहिले. बसमध्ये केवळ एकच प्रवासी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
संगमेश्वर बसस्थानकातून सकाळी सातच्या सुमारास चालक रवींद्र साप्ते हे एमएच २० बीएल २१४८ क्रमांकाची उमरे एसटी बस घेऊन निघाले होते. बस फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावर रामदास मिसळ स्टॉलजवळ पोहोचली असताना विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण तुटला. त्यामुळे विद्युतप्रवाह असलेली वाहिनी अचानक बसवर कोसळली.
वाहिनी बसच्या संपर्कात येताच वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांनी तत्काळ सीटचा आधार घेतल्याने गंभीर दुर्घटना टळली. काही क्षणांत विद्युतप्रवाह खंडित झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. शिगवण यांना किरकोळ दुखापत झाली.
दरम्यान, चालक साप्ते हे चालकाच्या सीटवर अधांतरी स्थितीत असल्याने विद्युतवाहिनीच्या थेट संपर्कात आले नाहीत. त्यामुळे त्यांचा जीव बचावला. बसमधील एकमेव प्रवासीही सीटला टेकून बसला होता. त्याच्या पायात चप्पल असल्याने त्यालाही विजेचा धक्का जाणवला नसल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने महावितरणला माहिती दिली. त्यानंतर लाइनमन होडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. विद्युतप्रवाह सुरक्षितपणे बंद करून धोकादायक विद्युतवाहिनी हटवण्यात आली आणि मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आला.
या घटनेमुळे संगमेश्वर तालुक्यातील रस्त्यालगतच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी जीर्ण विद्युत खांब, तारा आणि वाहिन्यांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रस्त्यालगतच्या विद्युत यंत्रणेची तातडीने पाहणी करून धोकादायक खांब व वाहिन्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
फणसवणे येथील या घटनेत बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र धावत्या एसटी बसवर विद्युतवाहिनी कोसळण्याच्या घटनेने सार्वजनिक वाहतूक मार्गालगतच्या विद्युत सुरक्षेकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.




