अवैध दारूधंद्यांवर कारवाईचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन

प्रवीण जाधव यांचे आमरण उपोषण अखेर स्थगित

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील अवैध दारूधंदे, गोवा बनावटीच्या मद्याची विक्री, गांजा व अन्य अमली पदार्थांचे व्यवहार बंद करावेत, तसेच अवैध धंद्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण राजाराम जाधव यांनी १५ ऑगस्टपासून सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या आश्वासनानंतर स्थगित केले.

चिपळूण तालुक्यातील गावठी हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री बंद करणे, गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर विक्री रोखणे, गांजा व इतर अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता मोठे हातभट्टी चालक, पुरवठादार आणि अवैध धंद्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करावी, अशा विविध मागण्या जाधव यांनी केल्या होत्या.

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चिपळूण विभागाचे निरीक्षक सुनील यांनी १५ ऑगस्ट रोजी जाधव यांना पत्र देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. चिपळूण तालुक्यातील अवैध दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच अमली पदार्थांच्या धंद्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी लेखी हमी या पत्रातून देण्यात आली आहे.

तालुक्यात अवैध दारू व अमली पदार्थांच्या धंद्यांवर नियमित देखरेख ठेवण्यासाठी विभागाचे स्वतंत्र पथक कार्यरत असल्याचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना गोपनीय तक्रारी करता याव्यात यासाठी शासनाची ‘आपले सरकार’ तक्रार निवारण प्रणाली तसेच विभागाचे सुविधा पोर्टल उपलब्ध असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शाळा, महाविद्यालये तसेच युवकांची वर्दळ असलेल्या परिसरात वेळोवेळी गस्त आणि विशेष तपासणी करून अवैध दारू व अमली पदार्थांची विक्री होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात येईल. संबंधितांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येईल, असे विभागाने स्पष्ट केले आहे. या कारवाईसाठी एक महिन्याची मुदत देण्यात यावी, अशी विनंतीही विभागाने केली आहे.

प्रांताधिकारी तसेच प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रवीण जाधव यांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले. या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पाठिंबा दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button