
लोटे येथे मोकाट गुरांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे परिसरात मोकाट गुरांच्या मोठ्या कळपामुळे वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला. तब्बल ५०० ते ६०० मोकाट गुरांचा कळप महामार्गावर आल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
लोटे परिसरातून मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अशा वेळी अचानक मोठा गुरांचा कळप महामार्गावर आल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली. गुरांचा कळप रस्त्यावरच ठाण मांडून उभा राहिल्याने अनेक ठिकाणी वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत होती.
महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. गुरांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत होती.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असल्याचे दिसून आले.
मोकाट गुरे अचानक वाहनांसमोर आल्यास अपघात होण्याची शक्यता असून, भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे महामार्गावरील मोकाट गुरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, महामार्गावर मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा वावर असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिक आणि वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गावर मोकाट गुरे येऊ नयेत यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच गुरांच्या मालकांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून महामार्गावरील मोकाट गुरांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात या गुरांमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



