रुग्णवाहिकांवर आता राहणार ‘डिजिटल नजर’


खासगी रुग्णवाहिकांना दरपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक; चार डिजिटल प्रणाली जोडणार


मुंबई : राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि शिस्तबद्ध करण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण’ आखण्यात येणार आहे. प्रस्तावित धोरणांतर्गत चार स्वतंत्र डिजिटल प्रणाली एकमेकांशी जोडण्यात येणार असून, त्यामुळे प्रत्येक रुग्णवाहिकेवर डिजिटल पद्धतीने नजर ठेवणे शक्य होणार आहे. खासगी रुग्णवाहिकांना दरपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक केले जाणार असून, कमाल दरही अधिसूचित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांना आपल्या जवळ उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेची माहिती, तिचे नेमके स्थान, रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा अंदाजित वेळ तसेच संभाव्य भाड्याची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध होणार आहे. गरजेनुसार व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.

सध्या पाच हजारांहून अधिक खासगी रुग्णवाहिका

राज्यात भागीदारी प्रकल्पांतर्गत सुमारे १ हजार ७६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. याशिवाय खासगी रुग्णालये, धर्मादाय संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या सुमारे पाच हजार रुग्णवाहिका कार्यरत आहेत. मात्र, रुग्णवाहिका नेमकी कुठे आहे, ती उपलब्ध आहे की नाही, रुग्णापर्यंत किती वेळात पोहोचेल, कोणत्या वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आहे तसेच आकारण्यात येणाऱ्या दराची जबाबदारी कोणाची, याची एकत्रित माहिती नागरिकांना सहज उपलब्ध होत नाही. ही उणीव नव्या धोरणातून दूर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

चार डिजिटल प्रणाली एकमेकांशी जोडणार

प्रस्तावित व्यवस्थेत नागरिकांसाठी एक प्रणाली, रुग्णवाहिकाचालकांसाठी दुसरी, रुग्णवाहिकेतील टॅबलेटसाठी तिसरी तसेच आरटीओ आणि आरोग्य विभागासाठी चौथी अशा चार स्वतंत्र डिजिटल प्रणाली एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत.

रुग्णवाहिकेतील टॅबलेटवर रुग्णाची प्राथमिक माहिती, महत्त्वाची लक्षणे आणि दिलेल्या उपचारांची नोंद करता येणार आहे. रुग्णालयाशी व्हिडिओ संपर्क साधण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिकेतील एईडी, ऑक्सिजन, सक्शन यांसारखी आवश्यक वैद्यकीय उपकरणे कार्यरत आहेत की नाहीत, याची नोंदही डिजिटल पद्धतीने करता येणार आहे.

प्रत्येक फेरीची डिजिटल नोंद, ई-पावतीही मिळणार

रुग्णवाहिकेच्या प्रत्येक फेरीची डिजिटल नोंद ठेवण्यात येणार असून, नागरिकांना ई-पावती उपलब्ध करून देण्याचीही तरतूद प्रस्तावित आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याबरोबरच अवाजवी भाडे आकारणीला आळा बसण्याची अपेक्षा आहे. खासगी रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक प्रसिद्ध करणे बंधनकारक केले जाणार असून, कमाल दर अधिसूचित करण्याचाही प्रस्ताव आहे.

अपघातानंतर रुग्णवाहिका किती वेळेत घटनास्थळी पोहोचते, रुग्णाला प्राथमिक उपचार किती वेगाने मिळतात आणि त्याला रुग्णालयात किती लवकर दाखल केले जाते, या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तंत्रज्ञान, पारदर्शकता, शिस्त आणि उत्तरदायित्व यांचा समन्वय साधणारे सर्वसमावेशक धोरण लवकरच आखण्यात येईल. नागरिकांना विश्वासार्ह रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे हा या धोरणाचा प्रमुख उद्देश असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button