
देवरुख पोस्ट कार्यालयात रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करा, आ. शेखर निकम यांची मागणी
संगमेश्वर तालुक्याचे प्रमुख केंद्र असलेल्या देवरुख येथील पोस्ट कार्यालयात रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीसाठी देवरुख पंचायत समितीचे उपसंभापती प्रफुल्ल बाईत सातत्याने पाठपुरावा करत असून, लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या देवरुखसह परिसरातील सुमारे ७० गावांतील नागरिकांना रेल्वे तिकिटांचे आरक्षण करण्यासाठी सुमारे २० किलोमीटर अंतरावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर जावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि श्रम मोठ्या प्रमाणात खर्च होतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना केवळ तिकीट आरक्षणासाठी दूरचा प्रवास करावा लागत असल्याने मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
देवरुख हे संगमेश्वर तालुक्याचे प्रशासकीय, शैक्षणिक आणि व्यापारी केंद्र असल्याने येथे दररोज हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत देवरुखच्या मुख्य पोस्ट कार्यालयात संगणकीकृत रेल्वे आरक्षण केंद्र सुरू झाल्यास परिसरातील हजारो प्रवाशांना स्थानिक स्तरावरच रेल्वे निकट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होईल. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय दूर होऊन प्रवास अधिक सुलभ होणार असल्याने ही मागणी तातडीने मान्य करावी, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.




