
तुटलेल्या वीजवाहिनीनी घेतला गाईंचा बळी;पिसई येथे दोन गाभण गाईंचा शॉक लागून मृत्यू

दापोली |
दापोली तालुक्यातील पिसई गावात मंगळवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत वीजेच्या खांबावरील थ्री फेज वाहिन्यांपैकी एक वीजवाहिनी तुटून खाली पडल्याने दोन गाभण गाईंचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिसई गावातील रहिवासी नारायण भिकू मोरे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि. २८) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमी परिसरात गुरे चारण्यासाठी गेले होते. गुरे पुढे सरकत असताना दोन गाभण गाई अचानक मोठ्याने ओरडू लागल्या. संशय आल्याने ते घटनास्थळी धावले असता वीजेच्या खांबावरील एक वीजवाहिनी तुटून जमिनीवर पडलेली असून त्याच विद्युतवाहिनीच्या संपर्कात आल्याने दोन्ही गाई मृतावस्थेत पडलेल्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
प्रसंगावधान राखत त्यांनी गाईंच्या जवळ हात न लावता तत्काळ गावातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर अजित एसरे यांनी डीपीवरील फ्यूज काढून वीजपुरवठा बंद केला. त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळला. या घटनेत मृत झालेल्या दोन्ही गाभण गाईंची एकूण किंमत सुमारे ₹१५ हजार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित कुटुंबाला लवकरच नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच, महावितरणचे वायरमन व संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तलाठ्यांनी पंचनामा सुरू केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर गाईंचा ताबा मालकांना देण्यात येणार आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मोरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे., तर, महावितरणने तुटलेल्या वीजवाहिन्यांची नियमित तपासणी करून अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.



