
️नवी मुंबईतून आंतरराष्ट्रीय उड्डाणाला सुरुवात! अबू धाबीहून पहिले विमान दाखल; वॉटर कॅनन सलामीने स्वागत!
Navi Mumbai : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपल्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला. अबू धाबीहून आलेले एअर इंडिया एक्सप्रेसचे आयएक्स २०८ हे पहिले नियोजित आंतरराष्ट्रीय विमान सकाळी १०.२० वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.या ऐतिहासिक आगमनानिमित्त विमानाला पारंपरिक ‘वॉटर कॅनन सलामी’ देऊन स्वागत करण्यात आले.
या सोहळ्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवांच्या शुभारंभाची नोंद झाली असून, भारताच्या नव्या जागतिक प्रवेशद्वाराच्या भूमिकेला अधिक बळकटी मिळाली आहे. या पहिल्या आंतरराष्ट्रीय नियोजित उड्डाणामुळे नवी मुंबईचा जगाशी थेट संपर्क अधिक सुलभ झाला आहे.
कामे युद्धपातळीवर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने त्याच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाण प्रमाणीकरण चाचणीसह कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल काही महिन्यांन पूर्वी उचलले होते. नवी मुंबई इंटरनॅशनल विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे ए ३२० विमान यशस्वीरित्या खाली उतरले होते. विमानतळाची धावपट्टी व इतर कामे आता पूर्ण झाली असून इतर कामे युद्धपातळी सुरु आहेत.
तापमान नियंत्रित ‘कूल कॉरिडोर’ची व्यवस्था
विमानतळावरून सुरुवातीच्या टप्प्यात औषधनिर्मिती आणि नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी कार्गो टर्मिनलमध्ये विशेष तापमाननियंत्रित ‘कूल कॉरिडोर’ ची व्यवस्था करण्यात आली आहे. यात लशी, जैविक औषधे, समुद्री अन्न, फळे आणि भाज्या यांच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोल्डचेनची रचना करण्यात आली आहे.
जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या क्षेत्राचा सर्वांगीण विकास देखील सक्षम करेल,” असे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी या आधीच प्रसार माध्यमांना सांगितले आहे. नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असणार आहे. एक्सप्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे.




