
डॉ.अतुल मोहोड यांची राष्ट्रीय जैवऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती!
दापोली१४ :- दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची भारत सरकारच्या सरदार स्वर्णसिंग राष्ट्रीय जैवऊर्जा संस्था (SSS-NIBE), कपूरथला, पंजाब येथे महासंचालक (Director General) म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय जैवऊर्जा संस्था ही नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली देशातील अग्रगण्य संशोधन संस्था असून, जैवऊर्जा संशोधन, तंत्रज्ञान विकास, प्रशिक्षण आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील समन्वयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडते.
डॉ. अतुल मोहोड यांनी गेल्या २५ वर्षांत अध्यापन, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. जैवऊर्जा, सेंद्रिय शेती, कृषी अवशेषांपासून ऊर्जा निर्मिती आणि शेतकरी हिताच्या विविध संशोधन प्रकल्पांमुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.
ही नियुक्ती केवळ डॉ. मोहोड यांचा सन्मान नसून कोकण, महाराष्ट्र आणि संपूर्ण कृषी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील जैवऊर्जा संशोधनाला नवी गती मिळेल आणि शाश्वत ऊर्जा विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
डॉ. अतुल मोहोड यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील वाटचाली करता शुभेच्छा देण्यात येत आहेत.




