मुसळधार पावसामुळे दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात साचले पावसाचे पाणी


दापोली तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्याप्रमाणात पाणी साचले असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात दापोलीसह मंडणगड तालुक्यातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, प्रवेशद्वारात पाणी साचल्याने गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच गंभीर रुग्णांना रुग्णालयात ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे काही रुग्णांना व्हीलचेअर आणि स्ट्रेचर पाण्यातून नेण्याची वेळ येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते. मात्र, यावर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
पावसाचे पाणी त्वरित वाहून जाण्यासाठी योग्य जलनिस्सारण व्यवस्था नसल्याने ही समस्या वारंवार उदभवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी तसेच भविष्यात ही समस्या उदभवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button