
गडनदी धरण ओव्हरफ्लो; नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
संगमेश्वर : तालुक्यातील गडनदी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गडनदी धरण क्षेत्रात ५ जुलै रोजी पर्जन्यमापन व पाणी पातळीची नोंद करण्यात आली. धरणाची एकूण पाणी पातळी १२२.२० मीटर इतकी आहे, तर सध्या गडनदी धरणात एकूण पाणीसाठा ६६.८५१३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) आणि उपयुक्त पाणीसाठा ६६.५३९३ द.ल.घ.मी. एवढा आहे. ५ ते ६ जुलै रोजी सकाळी ८.३० पर्यंत १०३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत गडनदी धरण क्षेत्रात एकूण ९९४ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सांडव्यावरील विसर्ग – १२६५४२ क्युमेक्स, तर विमोचकातील सोडलेले पाणी ०.०० क्युमेक्स आहे. गडनदी धरण ६ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता भरून वाहू लागले. त्यावेळी पाणी पातळी १२१.२० मीटर इतकी होती, तर सांडव्यावरून १.३१५ क्यूसेक्स इतके पाणी नदीपात्रात वाहत आहे.
नदीपात्राच्या पाण्यात वाढ होताच पाटबंधारे विभागाने नदी काठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. सध्या पावसाला जोर आहे. गडनदी धरण पहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरू नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करू नये. नागरिक, शेतकऱ्यांनी स्वतःसह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन चिपळूणच्या पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने केले आहे.




