चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीचे पाणी बाजार पुलाला; प्रशासन अलर्ट मोडवर


रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहरावर पुन्हा एकदा पुराचे सावट गडद झाले आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून रविवारी नदीचे पाणी शहरातील बाजार पुलाला लागले. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील चिंचनाका, भेंडी नाका, अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा परिसर आणि नाईक कंपनी या सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून काही ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नदीची पातळी आणखी वाढल्यास बाजारपेठेसह इतर सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

महसूल, नगरपालिका, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नदीकाठावरील नागरिक आणि व्यापाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यकतेनुसार पुढील उपाययोजना केल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी विनाकारण नदीकाठावर किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चिपळूणमध्ये पुराचा धोका अद्याप कायम असून पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button