मुंबई-गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाकण-नागोठणे दरम्यान वाहनांच्या किलोमीटरभर रांगा, प्रवाशांचे हाल


रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रविवारी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसला. वाकण ते नागोठणे दरम्यान हॉटेल गुलमोहर परिसरात कोलाडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या किलोमीटरभर रांगा लागल्याने महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना तासन्तास महामार्गावरच अडकून राहावे लागले.

याचवेळी वाकण येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण झाले, तर संथ गतीने वाहतूक सुरू असल्याने कोंडीत अधिक भर पडली.

दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकल्याने महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेकांना वाहनांमध्येच तासनतास थांबावे लागले. अन्न, पिण्याचे पाणी आणि अन्य आवश्यक सुविधांचा अभाव जाणवत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबई-गोवा महामार्गावरील या वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाढला असून, कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावरील साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सध्या रायगडसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहनचालकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button