
पावसाळ्यापूर्वी नगरपरिषदेची धोकादायक स्थळांवर कारवाई; ३९७ नोटिसा बजावल्या
धोकादायक झाडे, जीर्ण इमारती व आपत्तीग्रस्त भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
राजापूर, प्रतिनिधी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी राजापूर नगरपरिषद प्रशासनाने विशेष मोहीम राबवून शहरातील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली असून संबंधितांना नोटिसा बजावण्याची कारवाई हाती घेतली आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम राबविण्यात आली आहे.
नगरपरिषद हद्दीतील धोकादायक झाडे, जीर्ण व धोकादायक इमारती तसेच पूर, दरड अथवा अन्य नैसर्गिक संकटांचा धोका असलेल्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना स्थलांतराबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये धोकादायक झाडांच्या मालकांना ३७, धोकादायक इमारतींच्या मालकांना ५७ आणि पावसाळ्यात धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिकांना स्थलांतराबाबत ३०३ अशा एकूण ३९७ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तहसीलदार कार्यालय आणि राजापूर नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन नोटिसांद्वारे करण्यात आले असून, पूरस्थिती किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याची जबाबदारी शासन अथवा प्रशासनावर राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




