
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनसचे नामांतर करून त्यास ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ असे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
परिवहन व बंदरे विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. २६ मे २०२६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नामांतरास मंजुरी देण्यात आली आहे.
स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ संसदपटू व माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मधू दंडवते यांच्या कार्याचा गौरव म्हणून सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनसला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या रेल्वे स्थानकांच्या नामांतरासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक कार्यवाही करून प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने गृहमंत्रालयाकडे केली आहे.
या प्रस्तावावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षाही राज्य सरकारने व्यक्त केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचे कोकण विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
कोकणवासीयांसाठी आनंदाचा क्षण
“स्वातंत्र्यसैनिक, माजी केंद्रीय मंत्री आणि कोकणचे सुपुत्र लोकमान्य मधू दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून मंत्रालय स्तरावर कोकण विकास समितीकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. राज्य मंत्रिमंडळाने नामांतराच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याने हा कोकणवासीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. आता केंद्र सरकारनेही या प्रस्तावास लवकर मान्यता द्यावी, अशी अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया या समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर व सदस्य अनंत सावंत यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केली.




