कुर्धे पुलाच्या अपघातानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आक्रमक; मयुरेश्वर पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन.

मौजे कुर्धे येथील पुलाचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. या बेकायदेशीर आणि बोगस कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी रत्नागिरी तालुकाप्रमुख श्री. मयुरेश्वर पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा.सौ. अस्मिता केंद्रे यांना आज जाहीर निवेदन देण्यात आले.

अंदाजपत्रक आणि वर्क ऑर्डरशिवाय काम सुरू
तालुक्यातील कुर्धे येथील (लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान) नदीवर जिल्हा परिषद बांधकाम कंत्राटदाराकडून पुलाचे काम सुरू होते. मंगळवारी पुलाचा काँक्रीटचा भाग कोसळून एका निष्पाप व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे या कामाचे कोणतेही अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा (Tender) किंवा वर्क ऑर्डर अस्तित्वात नव्हती. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय कंत्राटदाराने कोणाच्या आदेशाने हे काम सुरू केले? असा संतप्त सवाल या निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.

कंत्राटदारांचे परवाने रद्द करण्याची मागणी
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कंत्राटदारांची मनमानी आणि बोगस कामे सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अशा बोगस कामांना भविष्यात कोणतीही मंजुरी किंवा निधी देऊ नये, तसेच विनापरवाना काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराचे नोंदणी प्रमाणपत्र (लायसन्स) तातडीने रद्द करावे, अशी मागणी मयुरेश्वर पाटील यांनी केली आहे. या भ्रष्टाचारात जर जिल्हा परिषदेचे अधिकारी सामील असतील, तर त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करून केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
हे निवेदन देताना शिवसेना आणि युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत, उपतालुकाप्रमुख श्री. विजय देसाई, उपशहर प्रमुख सलील डाफळे, विभाग प्रमुख श्री. किरण तोडणकर, श्री. साजिद पासवकर, उपविभाग प्रमुख श्री. सचिन सावंतदेसाई, श्री. अजिंक्य सनगरे आणि श्री. आदेश (आबू) भाटकर या कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button