राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर ; पुढील ३ ते ४ दिवसात आणखीन काही भागात दाखल होण्याचा अंदाज!


देशातील ईशान्येकडील भागांसह पश्चिम बंगालमधील काही भागात मोमसी पावसाने वाटचाल केली आहे. मात्र, मागील दोन दिवसांपासून राज्यात मोसमी पावसाची उत्तर सीमा सोलापूर आणि कोकणातील हर्णे येथे स्थिर असून मोसमी पाऊस एकाच जागी रेंगाळल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस काहीसा लांबण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुढील ३ ते ४ दिवसात राज्यातील इतर भागात मोसमी पाऊस दाखल होण्यास स्थिती अनुकूल आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणासह मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मोसमी पाऊस दाखल होण्याचा सरासरी कालावधी हा साधारणपणे ७ ते ११ जून मानला जातो. मात्र, यावर्षी या कालावधीत मोसमी पावसाने समाधानकारक वाटचाल झाली नसून त्याच्या पुढील वाटचालीस ३ ते ४ दिवस लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात मोसमी पावसाची प्रगती होण्यास आणखीन काही दिवस लागण्याची शक्यता आहे. यंदा राज्यातील नागरिकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव यंदाच्या मोमसी पावसाच्या हंगामावर दिसतो आहे. हवामान विभागाकडून यंदा देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या राज्यातील मुंबई आणि पुण्यासह इतरही मोठ्या शहरांमध्ये पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यातच मोसमी पाऊस लांबणीवर पडल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या समस्यांमध्येही वाढ होण्याचा अंदाज आहे.

सध्या मोसमी पावसाला पुढील वाटचालीसाठी अनुकूल स्थिती असली तरीही आवश्यक हवेचा जोर तसेच आर्द्रता यांची कमतरता असल्याने मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथगतीने सुरु आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच ढगाळ वातावरण दिसत असले तरीही मोसमी पावसासाठी मोठ्या प्रमाणावर ढगांची घनता अपेक्षित असते. त्याचा अभाव असल्यानेही त्याचा परिणाम मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीवर झाला असण्याचा अंदाज आहे. सध्या राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरच मोसमी पावसाची प्रगती होत नसल्याने राज्याच्या अंतर्गत भागात मोमसी पावसाची वाटचाल होण्यास आणखीन काही दिवसांचा अवधी लागू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागात कमाल तापमानात काहीशी वाढ झाल्याचेच दिसून येत आहे. पुढील पाच दिवसांत राज्यातील कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पावसाची नोंद होत असून पुढील काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होण्याचा अंदाज आहे. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम असून बुधवारी ब्रम्हपुरी येथे ४५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली जे सरासरी कमाल तापमानाहून ६.२ अंशांनी अधिक नोंदले गेले. पुढील दोन दिवसांत विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून तेथील काही जिल्ह्यांना शुक्रवारी आणि शनिवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबईसह उत्तर कोकणातील अनेक भागात उन्हाची काहिली कायम असून नागरिकांना आता पावसाचे वेध लागले आहेत. दरम्यान, बुधवारीही पालघर येथे उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली तर डहाणू येथे ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मुंबईचा पारा ३५ अशांवर स्थिर असून पुढील काही दिवस मुंबईकरांना पावसाची वाट पाहावी लागेल, असा अंदाज आहे. दरम्यान, गुरुवारी पालघर येथे उष्ण आणि दमट वातावरण राहील तर मुंबई, ठाणे आणि रायगड येथे हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button