
मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्प्यात; खेड नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज
पूरग्रस्त ५०३ घरांची यादी तयार; सुमारे ६ हजार नागरिकांसाठी विशेष उपाययोजना
खेड : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी खेड नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून मान्सूनपूर्व कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. शहरातील पूरप्रवण भागांमध्ये विशेष उपाययोजना राबविण्यात येत असून नाले सफाई, गटारांची स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.
दोन प्रभागांतील ५०३ घरे पूरप्रभावित
नगरपरिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शहरातील दोन प्रभागांमधील ५०३ घरांचा पूरप्रभावित घरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे ६ हजार असून त्यांच्या सुरक्षिततेसाठ आतापासूनच विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे.
जगबुडी नदीच्या पुराचा सर्वाधिक फटका बाजारपेठेला
मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आल्यास त्याचे पाणी शहरातील बाजारपेठेत शिरते. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक तसेच नदीकाठच्या रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर नगरप्रशासनाने पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे.
नाले सफाई व गटार स्वच्छतेची कामे वेगात
शहरातील पावसाचे पाणी सुरळीत वाहून जावे यासाठी प्रमुख नाले, गटारे आणि जलनिस्सारण व्यवस्था स्वच्छ करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. मान्सूनपूर्व ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
हे भाग पूरप्रवण क्षेत्र म्हणून घोषित
नगरपरिषदेच्या यादीत खालील भागांचा पूरप्रभावित क्षेत्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे :
मटण-मच्छी मार्केट परिसर, सफा मस्जिद चौक, साठे मोहल्ल्याचा काही भाग, पौत्रिक मोहल्ला, तांबे मोहल्ला, गांधी चौक, निवाचा तळ, वाल्की गल्ली, गुजरआळीचा काही भाग, पानगल्ली, बाजारपेठ परिसर
खांबतळे, नगरपरिषद कार्यालय परिसर, तीनबत्ती नाका, खेड-दापोली रोड परिसर, ब्राह्मणआळी, कासारआळी
सोनारआळीचा काही भाग, साळीवाडा
पूरस्थितीत होड्या व बचाव पथके तैनात
संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्त भागांमध्ये आवश्यकतेनुसार होड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच बचाव पथकांमार्फत संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
पूरप्रवण भागातील नागरिकांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ नगरपरिषदेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.
“मान्सूनपूर्व सर्व तयारी पूर्ण करून नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे,” — महादेव रोडगे, मुख्याधिकारी, खेड नगरपरिषद.




