ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता-अभिनेत्री नीलम शिर्के


अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत अभिनेत्री गटातील निवडणूक माजी संचालिका वर्षा उसगावकर आणि यंदा प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्री नीलम शिर्के यांच्यात चुरशीने लढत होणार असे संकेत असताना नीलम शिर्के यांनी अचानक यू टर्न घेतला आहे.त्यांनी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगत वर्षा उसगावकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. परिणामी अभिनेत्री गटातील दुरंगी सामन्यात वर्षा उसगावकर यांचा निवडणुकीतील मार्ग सुकर बनताना दिसत आहे.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज, छाननी प्रक्रिया पार पडल्यानंतर आता अर्ज माघारीकडे लक्ष लागले आहे. या टप्प्यावर निवडणूक येऊन ठेपली असताना अभिनेत्री गटातील घडामोडी उल्लेखनीय ठरल्या आहेत.मागील वेळेप्रमाणे याही वेळी अभिनेत्री माजी संचालिका वर्षा उसगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे वर्षा उसगावकर आणि नीलम शिर्के यांच्यातील निवडणूक रंगतदार होणार अशी चिन्हे होती.

शिर्के यांची भूमिका

दरम्यान, या निवडणुकीत नीलम शिर्के यांनी माघार घेत वर्षा उसगावकर यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले गेले आहे की, मी सध्या नाट्य परिषद बालरंगभूमी परिषद आणि विविध सामाजिक सेवा संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर रंगभूमीची आणि दिव्यांग कलाकारांची सेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि अभिनेते आनंद काळे या दोघांनी उभे राहण्याबद्दल विनंती केली होती.त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महामंडळाच्या संचालिका वर्षा उसगावकर या यावर्षीच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नसल्याचे राजेभोसले यांनी मला कळवले होते. तथापि वर्षाताईंनी अर्ज दाखल केल्याचे माझा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर मला कळाले. वर्षाताई सारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत माघार घेणार आहे.

समाज माध्यमातून काही मंडळींनी आरोप – प्रत्यारोप आणि इतरांवर चिखलफेक करायला सुरुवात केली आहे. ही बाब अत्यंत वेदनादायी आहे. माझी उमेदवारी माघारी घेण्यामुळे कोणाची गैरसोय झाली असेल तर मी व्यक्तिशः दिलगिरी व्यक्त करते, असेही नीलम शिर्के यांनी पत्रकात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button