
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले! १० दिवसांत ५ रुपयांची वाढ!
सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट फटका भारतीय ग्राहकांना बसला आहे.
शनिवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. आज पेट्रोल ८७ पैशांनी तर डिझेल ९१ पैशांनी महागले आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांतील ही तिसरी मोठी दरवाढ आहे.
या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून, पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना महागाईच्या आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
१० दिवसांत ५ रुपयांची दरवाढ
याआधी १६ मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात थेट ३ रुपयांची मोठी वाढ केली होती. त्यानंतर १९ मे रोजी सर्व प्रमुख महानगरांमध्ये पुन्हा ९० पैशांची दरवाढ झाली. आज (शनिवारी) झालेल्या ताज्या वाढीसह गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल तब्बल ५ रुपयांनी महागले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका; केंद्र सरकारचे आवाहन
पश्चिम आशियातील युद्धाच्या परिस्थितीमुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार, अशी भीती आणि अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्टीकरण जारी केले आहे.
‘देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये (Panic Buying) आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे. काही पेट्रोल पंपांवर निर्माण झालेला तात्पुरता ताण दूर करण्यासाठी तेल कंपन्यांकडून सतत देखरेख आणि समन्वय सुरू आहे.’
तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे नवे दर (प्रति लीटर)
शहर पेट्रोलचे नवे दर (बदल) डिझेलचे नवे दर (बदल)
मुंबई ₹ १०७.५६ (+०.८७) ₹ ९४.०५ (+०.९१)
दिल्ली ₹ ९९.५१ (+०.८७) ₹ ९२.४९ (+०.९१)
कोलकाता ₹ ११०.५७ (+०.८७) ₹ ९६.०४ (+०.९१)
चेन्नई ₹ १०४.५४ (+०.८७) ₹ ९६.१६ (+०.९१)
गुरुग्राम ₹ १००.३८ (+०.८७) ₹ ९२.९२ (+०.९१)
नोएडा ₹ ९८.७८ (+०.८७) ₹ ९३.१२ (+०.९१)




