
सोनं, तेला पाठोपाठ आता दुधही महागणार; गोकुळ कडूनही दुधात दरवाढ
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता भारताला बसताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्यानं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या.
सोने, चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ करत 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. सीएनजीचे दर 2 रुपयांनी महागले. अशात आता सर्वसामान्यांच्या दररोजच्या जीवनात महत्त्वाचं असलेल्या दुधाच्या किंमतीही वाढणार आहेत. परिणामी चहुबाजूंनी सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
देशातील आघाडीच्या अमूल आणि मदर डेअरीने दूध दरात वाढ केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) देखील आपल्या गायीच्या दूध विक्री दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही नवीन दरवाढ येत्या 21 मे 2026 पासून मुंबई, कोल्हापूर, पुणे आणि कोकण विभागातील सर्व शहरांमध्ये लागू केली जाणार आहे. शनिवारी गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात प्रशासक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत या दरवाढीवर निर्णय घेण्यात आला आहे.
या दरवाढीबाबत गोकुळनं दिलेल्या माहितीनुसार, ही दरवाढ प्रामुख्याने गायीच्या दूध प्रकारांसाठी लागू असेल. यामध्ये गायीचे दूध, टोण्ड दूध, गोकुळ शक्ती, स्टँडर्ड दूध या ब्रँडचा समावेश असेल. गोकुळनं गायीच्या दूधाच्या किमतीत वाढ केली आहे. मात्र म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे म्हशीच्या दूधाचे दर सध्या स्थिर राहतील.
या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील वाढते इंधन दर, कच्च्या मालाच्या किमती, वाहतूक खर्च आणि पॅकेजिंग साहित्यासाठी लागणारा खर्चात वाढ झाली आहे. शिवाय उकाड्यानं आणि चाऱ्याच्या टंचाईमुळं दूध संकलनात घट झाली आहे. याआधी 21 फेब्रुवारी रोजी गोकुळने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी दरात वाढ केली होती. मात्र त्याचा भार ग्राहकांवर टाकला नव्हता.
देशातील इतर आघाडीच्या दूध ब्रँड्सनी देखील किमती वाढवून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे. यामध्ये अमूल आणि मदर डेअरी या दोन्ही मोठ्या ब्रँड्सनी 14 मे 2026 पासून देशभरात आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ लागू केली आहे. ज्यामुळे अमूल गोल्ड 70 रुपये तर मदर डेअरी फुल क्रीम दूध 72 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे.




