केईएम’चे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा विरोध !

KEM : किंग एडवर्ड स्मारक म्हणजेच केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. मात्र रुग्णालयाचे नाव बदलण्यात आले असले तरी संक्षिप्त नाव कायम ठेवण्यात आले आहे. मात्र केईएम मार्डने या नामांतराला जोरदार विरोध केला आहे.

‘केईएम’ ही प्रतिष्ठित, नामांकित आणि वैद्यकीय सेवा देणारे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय असून येथील निवासी डॉक्टरांना, वैद्यकीय तज्ज्ञांना विश्वासात न घेता नामकरणाचा परस्पर निर्णय घेऊ नये, अशी मागणी ‘मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे. ‘केईएम’ रुग्णालय हे शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक महत्त्व असणारी ऐतिहासिक संस्था आहे. अनेक दशकांपासून ‘केईएम’ने सार्वजनिक आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये भरीव कामगिरी केली आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या संस्थेला मान्यता आहे. डॉक्टर, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्ण अशा अनेक पिढ्यांसाठी या संस्थेची ओळख आहे. या संस्थेमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे मत यासंदर्भात काय आहे, हे विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा; तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या संस्थेचे नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव हा निराशाजनक आहे, असे निवासी डॉक्टरांच्या संघटनेने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.

नाव बदलून समस्या सुटत नाही

एखाद्या ऐतिहासिक संस्थेचे नाव बदलून समस्या सुटत नाहीत, त्या समस्या समजून घेण्याची गरज आहे, याकडे निवासी डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. निवासी डॉक्टरांना वसतीगृहामध्ये पुरेशा सुविधा नाहीत, उद््वाहन वारंवार बंद पडते, मानधन वेळेवर मिळत नाही, अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी आरोग्यसेवा सक्षम करण्यावर भर देणे गरजेचे आहे. रुग्णालयामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत, हे समजून घेऊन त्यावर प्रशासकीय निर्णय घेण्याची गरज आहे. केवळ नाव बदलून या समस्या सुटणार नाहीत. त्यामुळे ‘केईएम’ रुग्णालयाचे नाव न बदलता ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्यावर भर द्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button