️किल्ले रायगडावर प्री-वेडिंग शूटचा धक्कादायक प्रकार; VIDEO व्हायरल, कारवाईची मागणी!

अलिबाग : किल्ले रायगडावर प्री वेडींग शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर प्रीवेडींग केल्याची एक चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. या नंतर समाधीस्थळावर प्री वेडींग शूट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील रुपनारायण मंदीरात प्रीवेडींग शूट केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रीवेडींग शूट वरून मंदीर व्यवस्थापन आणि प्रीवेडींग शूट करणाऱ्यांमध्ये वाद झाला होता. हे प्रकरण थांबत नाही तोच आता किल्ले रायगडावर प्रीवेडींग शूट केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत. गडावर छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ परिसरात हे प्रीवेडीग शूट करण्यात आले आहे.

सध्या ही चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. नेमके हे चित्रकरण कधी करण्यात आले आहे. याची स्पष्टता झालेली नाही. मात्र चित्रफीती मध्ये तरुण तरुणी समाधीस्थळाजवळ प्रीवेडींग शूट करत आहेत. त्यांच्या समवेत दोन छायाचित्रकारही आहेत. रायरेश्वराच्या मंदीर परूसरातून समाधीस्थळाकडे जाणाऱ्या दरवाज्यात हे छायाचित्रण करण्यात येत असल्याचा समोर आले आहे.

या प्री वेडीग शूटचे चित्रीकरण सध्या व्हायरल झाले आहे. त्यामुळे रायगडाचे स्थानमाहात्म न जपणाऱ्या आणि समाधीस्थळावर प्री वेडींग शूट करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. समाधीस्थळ परिसरात २४ तास पोलीस तैनात असतात, असे असूनही हे छायाचित्रण कसे करण्यात आले.. पुरातत्व विभागाकडून या छायाचित्रिकरणाला कशी परवानगी देण्यात आली असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हींदवी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगडाचे पावित्र राखण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. झालेला प्रकार निंदनीय आहे. जे कोणी यात सहभागी असतील त्यांच्यावर भारतीय पुरातत्व विभागाने कठोर कारवाई करायला हवी, त्याच बरोबर असे प्रकार पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यायला हवी असे निर्देश तटकरे यांनी पूरातत्व विभागाला दिले आहेत.

आधी दिवेआगर येथील मंदीरात प्रीवेडिंग शूटचा प्रकार आणि आता रायगड किल्ल्यावर शिवसमाधी स्थळावर झालेला प्रीवेडींगचा प्रकार या दोन्ही घटनांची गंभीर दखल प्रशासनाने घेणे आवश्यक आहे. प्री वेडींग शूट करतांना छायाचित्रकारांनी तारतम्य बाळगावे, स्थान महात्म्य आणि स्थानपावित्र्याला बाधा येईल अशी कृती करू नये अशी मागणी या घटनेनंतर केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button