गावखडी समुद्रात तिघेजण बुडाले; १३ वर्षीय मुलाचा मृत्यू


रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी किनाऱ्यावर समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या आपल्या दोन मुलांना आणि पुतण्याला वाचवण्यासाठी एका पित्याने समुद्राशी दोन हात केले. यात दोघांना मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेरही काढले; मात्र दुर्दैवाने स्वतःच्या लेकाला वाचवण्यात त्यांना अपयश आले. श्रेयश सागर गोसावी (वय १३) या शाळकरी मुलाचा या घटनेत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेमुळे तांदूळवाडी (ता. वाळवा, जि. सांगली) आणि मेर्वी (ता. रत्नागिरी) परिसरात शोककळा पसरली आहे.

मूळचे तांदूळवाडी येथील सागर मोहन गोसावी सध्या रत्नागिरीतील मेर्वी येथे भंगार व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. शुक्रवारी शाळा लवकर सुटल्याने दुपारी दीडच्या सुमारास सागर गोसावी आपला मुलगा श्रेयश, मुलगी आरोही आणि पुतण्या देवराज यांना घेऊन गावखडी येथील सुरूच्या बनात फिरायला गेले होते. दुपारच्या वेळी ही तिन्ही मुले समुद्राच्या फेसाळणाऱ्या पाण्यात आनंदाने खेळत असताना अचानक वाढलेल्या लाटांमुळे ती खोल पाण्यात ओढली जाऊ लागली. मुलांना पाण्यात गटांगळ्या खाताना पाहून पित्याच्या काळजाचा थरकाप उडाला. क्षणाचाही विलंब न लावता सागर गोसावी यांनी समुद्रात उडी घेतली. जीवाची बाजी लावत त्यांनी आधी आरोही आणि देवराज यांना सुखरूप किनाऱ्यावर आणले. मात्र, जेव्हा ते पुन्हा श्रेयशला वाचवण्यासाठी लाटांकडे वळले, तोपर्यंत काळाने झडप घातली होती आणि श्रेयश खोल पाण्यात बेपत्ता झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पूर्णगड सागरी पोलीस, स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम राबवली. मात्र, शुक्रवारी अंधार पडल्याने शोध कार्यात अडथळे आले. अखेर शनिवारी सकाळी ८ वाजता श्रेयशचा मृतदेह गावखडी किनाऱ्यावर तरंगताना सापडला. स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर (पावस) येथे सहावीत शिकणाऱ्या श्रेयशच्या निधनाची बातमी समजताच शाळेवर शोककळा पसरली आणि श्रद्धांजली वाहून शाळा बंद ठेवण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.

आपल्या डोळ्यादेखत लाडका मुलगा हिरावला गेल्याने गोसावी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button