
रत्नागिरी शहरातील कोकणनगर मार्गावर भरधाव दुचाकीने धडक देणार्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी शहरातील कोकणनगर मार्गावर भरधाव दुचाकीने धडक देणार्या तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील चर्मालय ते कोकणनगर मार्गावर राजनगर येथील बँक ऑफ इंडिया एटीएम समोर एका भरधाव दुचाकीने समोरून येणार्या तरुणीच्या गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात १९ वर्षीय तरुणी जखमी झाली असून, विनापरवाना आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात २० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. फिर्यादी पोलीस हवालदार शरद बाबल्या कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी प्रथमेश सोगम (वय ३२, रा. विनम्रनगर, गोडाऊन स्टॉप, रत्नागिरी) हा आपली होंडा ट्विस्टर दुचाकी (क्रमांक एमएच-०९-बीआर-७२५०) घेऊन कोकणनगरकडून चर्मालयच्या दिशेने जात होता. यावेळी राजनगर येथे त्याने आपली दुचाकी अत्यंत भरधाव आणि धोकादायक स्थितीत चालवत रस्ता ओलांडून चुकीच्या बाजूला नेली. याच वेळी समोरून येणार्या टीव्हीएस ज्युपिटर गाडीला (क्रमांक एमएच-०८-बीएच-२२८६) त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत ज्युपिटर चालक रक्षा राजेश पनसकर (वय १९, रा. कोकणनगर) ही तरुणी जखमी झाली असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com




