गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे दुसरे पर्व उत्साहात

५६ किमीमध्ये शरद खिलारे, रजनी सिंग विजेते तर ३५ किमीमध्ये आदित्य धुळप, श्रुती भिडे यांची बाजी

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन – दुसरे पर्व अतिशय उत्साही वातावरणात पार पडले. ५६ किलोमीटरच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात बीड येथील शरद खिलारे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर महिलांच्या गटात रजनी सिंग यांनी अव्वल स्थान मिळवले. ३५ किलोमीटरच्या स्पर्धेत पुरुष गटात रत्नागिरीचे आदित्य धुळप आणि महिला गटात पुणे येथील श्रुती भिडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी मध्यरात्री १२ वाजता श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानाच्या आवारात राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले. सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी स्पर्धेसंबंधी थोडक्यात माहिती देत डॉ. सामंत यांच्या खंबीर पाठबळाबद्दल आभार व्यक्त केले. त्यांचा सन्मान योगेश मोरे यांनी पालखीच्या आकारातील सन्मानचिन्ह देऊन केला.

या वेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “माझ्या मतदारसंघात आलेल्या सर्व धावपटूंचे स्वागत आहे. आपण सर्वजण ५६ व ३५ किमी अंतर धावणार आहात. सुवर्णसूर्य फाउंडेशनने कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन आणि अल्ट्रा मॅरेथॉन या स्पर्धांमध्ये सातत्य राखले आहे, त्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक धावपटू सहभागी झाले असून पुढील वर्षी ही संख्या दुप्पट होईल अशी अपेक्षा आहे. भविष्यात रत्नागिरीचे नाव भारतातील सर्वांत मोठ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी ओळखले जावे, तसेच समुद्रामुळे प्रसिद्ध असलेले रत्नागिरी मॅरेथॉनमुळेही जगभर पोहोचावे.”

उद्घाटनप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी, पंचायत समिती सदस्य सौ. दुर्गवळी, गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच श्री. कोल्हटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

स्पर्धा मध्यरात्री १२ वाजता सुरू झाली. भारतातील विविध राज्यांतील सुमारे २५० धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. रात्रीच्या धावासाठी प्रत्येक स्पर्धकाकडे हेड टॉर्च होती. मार्गावर दहा ठिकाणी हायड्रेशन पॉईंट ठेवण्यात आले होते. येथे पाणी, विविध फळे, एनर्जी ड्रिंक, सरबत, खजूर तसेच पाण्याच्या फवार्‍याची व्यवस्था करण्यात आली होती. सुवर्णसूर्य फाउंडेशनला विविध संस्थांच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले. तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी सायकलवरून धावपटूंना साथ दिली. स्पर्धकांनी मार्गावरील हायड्रेशन पॉईंट, आदरातिथ्य आणि उत्कृष्ट नियोजनामुळे ही स्पर्धा अत्यंत संस्मरणीय झाल्याचे सांगितले.

कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन, गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन आणि रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब आयोजित रोलर कॉस्टर सायक्लोथॉन या उपक्रमांमुळे रत्नागिरी जिल्हा तसेच जिल्ह्यातील जवळपास वीस ते पंचवीस गावे आता जागतिक पटलावर पोहोचू लागली आहेत. या सर्व उपक्रमांमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उपक्रमांसाठी काम करणाऱ्या सुमारे ऐंशी टक्के एजन्सी या कोकणातीलच आहेत.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्वतःच्या संकेतस्थळावरून नोंदणी, स्थानिक फोटोग्राफर्सची टीम तसेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित फोटोग्राफी यांसारख्या आधुनिक सुविधा या स्पर्धांमध्ये यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत.

यावर्षीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सकाळी १० वाजता स्पर्धा संपल्यानंतर अवघ्या सहा तासांत, म्हणजे दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व सहभागी धावपटूंना त्यांच्या स्पर्धेतील छायाचित्रे उपलब्ध करून देण्यात आली. स्पर्धकांपर्यंत फोटो पोहोचवण्याची ही आजवरची सर्वात जलद वेळ मानली जात आहे. हे संपूर्ण काम रत्नागिरीतील आर्यक सोल्युशन्स तसेच कोकणातील फोटोग्राफर ओम पाडळकर आणि त्यांच्या फोटोग्राफी टीमने उत्कृष्ट समन्वयातून पूर्ण केले. टीम कोकण कोस्टल आणि गणपतीपुळे अल्ट्राने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास हेच या यशाचे खरे गमक असल्याचे आयोजकांनी सांगितले.

भविष्यात या कार्यक्रमांतर्गत काम करणाऱ्या शंभर टक्के एजन्सीज कोकणातीलच असतील, असा विश्वास आयोजक प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केला.

चौकट : स्पर्धेचा सविस्तर निकाल
५६ किमी
पुरुष गट – शरद खिलारे, राहुल पवार, मनिष यादव
महिला गट – रजनी सिंग, नेहा रंजन, गीता परब

५६ किमी वयोगट निकाल
३५ वर्षांखालील – पुरुष : राहुल पवार, मनिष यादव, स्वप्नील सूर्यवंशी
३६ ते ५० – पुरुष : शरद खिलारे, अमितकुमार यादव, अमोल पटेल
महिला – रजनी सिंग, नेहा रंजन, गीता परब
५१ वर्षांवरील – पुरुष : आशुतोष गोडबोले, संतोष गायकवाड, निलेश सावंत
महिला – पूजा वर्मा

३५ किमी
पुरुष – आदित्य धुळप, संतोष शिंदे, रविंद्र
महिला – श्रुती भिडे, टिनू शर्मा, मानसी मराठे

३५ किमी वयोगट निकाल
३५ वर्षांखालील – पुरुष : आदित्य धुळप, संतोष शिंदे, अश्वनी पांडे
महिला – तनुश्री मालविय, प्रभांशी धनकर

३६ ते ५० – पुरुष : रविंद्र, सिताराम नांदोसकर, डॉ. महेश भिसे
महिला – टिनू शर्मा, मानसी मराठे, सुरिंदर जम्मुअल

५१ वर्षांवरील – पुरुष : वेंकटेश प्रभुदेसाई, डॉ. दादासाहेब सारंगकर, हेमंत भागवत
महिला – श्रुती भिडे, शेरिअन डौराडो, शालिनी वाझ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button