अनोख्या संकल्पनेसह रंगले, बांधावरचे साहित्य संमेलन

धामणवणेत रंगले बांधावरचे अनोखे साहित्य संमेलन राज्यातील नामवंत साहित्यिकांची अपरान्त भूमीत उपस्थिती

धामणवणे (चिपळूण) – आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत बांधावर आयोजित केलेले मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग असलेले हे संमेलन अनोखे, अनुकरणीय ठरले. जागोजागी अशी संमेलने व्हायला हवीत.’ या संमेलनातून धोक्यात आलेल्या वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल हे समाजाला सांगायला हवे. साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा,’ अशी भूमिका यावेळी मान्यवर साहित्यिकांनी व्यक्त केली.

कोकणात बांध म्हणजे भातशेतीसाठी पाण्याचा साठा करणारी, माती किंवा दगडांची अगदी छोटीशी जेमतेम वितभर उंचीची भिंत!. कोकणात हे बांध शेतीचे संरक्षण करतात, मृदसंधारण करतात आणि पावसाचे पाणी अडवून शेतीसाठी उपयुक्त ठरतात. वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पिकांच्या वाढीसोबतच जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे आणि मातीची धूप होण्यापासून रोखणे अशी महत्वाची कामे हे बांध करत असतात. कोकणच्या डोंगराळ भागात आणि भरपूर पावसात शेतीचे आधारस्तंभ ठरणाऱ्या या ‘बांध’वर साहित्य प्रेमींनी एक अनोखा प्रयोग करत साहित्य संमेलनाचे आयोजन केले आणि त्यांच्या या प्रयोगाचे राज्यभर कौतुक झाले. माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’, असे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारे ‘बांधावरचे संमेलन रविवारी (ता. ८ फेब्रुवारी) रोजी चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयुराची’ शिवारात संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, पारंपरिक वाद्य संबळच्या निनादात श्रीसातेरी मातेच्या वारूळाचे पूजन आणि पवित्र वाशिष्ठी-नर्मदा गंगाजलाने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन करून झाले. यावेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन या सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी, उद्घाटक डॉ. प्रशांत पटवर्धन, चिपळूणचे आमदार शेखर निकम, कोकणात सलग ११ ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वी करणारे सुभाष लाड, वाशिष्ठी उद्योग समूहाच्या प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव, नामवंत कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश गांधी यांनी खास मालवणी भाषेत गाऱ्हाणे घातले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविकातून बांधावरच्या संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. सोनाली खर्चे यांनी लिहिलेल्या आणि अमेय वराडे यांनी संगीतबद्ध केलेल्या बांधावरच्या गीताचे सादरीकरण वीणा परांजपे, सुखदा परांजपे, संगीता जोशी, संध्या आठल्ये, अपर्णा नातू, छाया पोटे, स्नेहल दीक्षित, संजय शिंदे, विजय कदम यांनी केले. साथसंगत यदुवीर चौगुले यांनी दिली. धीरज वाटेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

संमेलनाध्यक्ष बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्याच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना कृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवतं, साहित्य शिकवतं, साहित्य माहिती देते, साहित्य कैफियत मांडतं, साहित्य मानवी जीवनातील कंगोरे दाखविते म्हणूनच ते आपल्याला जवळचं वाटतं. असे बारटक्के म्हणाले. डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी उद्घाटनीय भाषणात, आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यक्रमाचे सिंहावलोकन केले. आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे. मात्र ती जीवंत असून तिचे स्वागत करायला हवे, असे मत मांडले. सांस्कृतिक प्रेमाचा डीएनए चिपळूणच्या लोकांमध्ये वाशिष्टीच्या प्रवाही पाण्यातून, इथल्या लाल मातीतल्या श्वासातून, ग्रामदैवत भैरीच्या जागृत श्रद्धेतून आणि महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या परशुरामाच्या आशीर्वादातून आल्याचे त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष मोदी म्हणाले, ‘आजचे संमेलन ही केवळ जागेची बदललेली रचना नाही, तर विचारांची दिशा बदलणारा प्रयोग आहे. आज इथे कविता केवळ ऐकली जाणार नाही ती अनुभवली जाणार आहे. कथा फक्त सांगितली जाणार नाही ती जमिनीतून उगवलेली वाटेल. गाणी रंगमंचावर नाही तर वाऱ्यासोबत झुलताना ऐकू येतील. आजचा दिवस मराठी साहित्याच्या वाटचालीत एक स्मरणीय टप्पा ठरेल, याची मला खात्री आहे.’ संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ काव्य अभ्यासक विजय जोशी यांचे कविता : तंत्र आणि मंत्र या काव्यविवेचनाला रसिकांनी छान प्रतिसाद दिला. ज्या कवितेमधे काव्यगुण, आशयगुण, नादलय गुण आहे अशी कविता आदर्श समजली जाते. आजचे कवी कविता लिहिल्याबरोबर फेसबुक, व्हॉटस्अप वर शेअर करण्याची घाई करतात. हे चुकीचे आहे. जसे लोणचे मुरल्यानंतर चविष्ठ होते तसे संस्कारण, परिपूर्ण, तटस्थतेने झालेली कविता छान होते असे ते म्हणाले. दुपारी भोजनानंतर ज्येष्ठ कथाकार सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन या सत्रात अमोल पालये (तिलोरी), ज्ञानेश्वर झगडे (खारवी) यांनी बोलीभाषांतील कथांचे उत्तम सादरीकरण केले. नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवींचे ‘माती, नाती अन् माणूस ‘ या विषयावर काव्य संमेलन रंगले. कवी अरुण म्हात्रे, सूत्रसंचालक कैलास गांधी यांचेसह सर्व मान्यवरांनी दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले. म्हात्रे आणि गांधी यांची काव्य’नोकझोक’ यामुळे काव्यसंमेलनाची रंगत अधिक वाढली. मुझ्झफर सय्यद, मंदार ओक, विनय माळी, विजय हटकर, राजेंद्र आरेकर, ईश्वर हलगरे, मेधा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू, श्रद्धा कळंबटे, विराज चव्हाण, राष्ट्रपाल सावंत आदी सर्वांच्याच ग्रामीण, शहरी व प्रेम कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

संमेलनाच्या समारोप सत्राला डॉ. तानाजीराव चोरगे, प्रकाश देशपांडे, सुहास बारटक्के, सुभाष लाड, शशिकांत मोदी, अरुण म्हात्रे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी मंडप, स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या सावलीत यशस्वी केलेल्या साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाचे अर्थात बांधावरच्या साहित्य संमेलनाचे मनापासुन कौतुक केले. यावेळी डॉ. चोरगे म्हणाले, ‘बांधावरचे साहित्य संमेलन ही संकल्पनाच अत्यंत उत्कृष्ठ आहे. शेतकऱ्याच्या शेतावर जायचे, तिथल्या वातावरणात साहित्यिकांनी रमायचं, तिथली पीकं पहायची, तिथल्या मातीचा सुगंध अनुभवून ती कपाळाला लावून भूमातेचा आशीर्वाद घ्यायचा, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, आणि स्वच्छ वाणी यांचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या संबंधित साहित्यांवर भाष्य करायचे. शेतकऱ्याच्या बांधावरुन त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे, त्यावर चर्चा करायची. शेतकरी कसा राहातो? काम कसे करतो? बोलतो कसा? ते अनुभवायचे. शेतकऱ्याच्या बांधावरुन शेती पहाताना पीकं डोलताना, पाहाताना, बांधावरुन एखादी नदी अगर नाला जवळून पाहाताना स्वर्ग सुख अनुभवल्याचा भास होतो. हे शेतावर गेल्यावरच कळते.’ असे चोरगे यांनी सांगितले. सुभाष लाड म्हणाले, ‘धामणवणे गावातील ‘साद मयुराची’ या शिवारात आयोजित केलेले बांधावरचे साहित्य संमेलन हे अभिनव आहेच पण ते आवश्यकही आहे. या बांधावरच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे मी मनापासून कौतुक करतो. माझं अर्ध आयुष्य बांधावरच गेलं आहे त्या आठवणींचा पुन्हा उजाळा देण्याची संधी मला इथे मिळाली.’
संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला रसिकांनी अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या ‘शाकाहारी मोंगा-पोपटीचा’ आस्वाद घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषद (चिपळूण शाखा) तर्फे आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी संमेलनाचे संकल्पक कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष अरुण इंगवले, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर यांसह संयोजन समितीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. विशेषतः प्राची जोशी, धीरज वाटेकर, सोनाली खर्चे, प्रकाश घायाळकर, मनीषा दामले, मुझफ्फर सय्यद, संगीता जोशी, मंगेश बापट, विलास महाडिक, वीणा परांजपे, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे, संध्या आठल्ये, विनायक ओक, स्नेहल जोशी, स्नेहल कुलकर्णी, संध्या साठे, अभिजीत देशमाने, आदी समिती सदस्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यांना बारटक्के कुटुंबीयांनी दिलेली साथ यामुळे हे संमेलन सुंदर सुनियोजित सुफल संपन्न झाले.

पारंपारिक संमेलनांना फाटा देऊन निसर्गाच्या सानिध्यात माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्य सहवास जवळपास ३५० साहित्यिक आणि रसिकांनी अनुभवला. निसर्गातील वस्तूंचा वापर करून दगड, पाने फुले यांनी सुंदर स्वागत रांगोळी काढलेली होती. काजूच्या झाडांच्या वनामध्ये बांधलेला दगड मातीचा बांध हेच व्यासपीठ होता. संमेलन परिसर शेणामातीने सारवलेला होता. विविध ठिकाणी पाने, निसर्गातील वस्तूंवर रेखाटलेल्या कविता जागोजागी झाडांवर टांगल्या होत्या. झाडाच्या फांदीला लाकडी पट्टी लाऊन आणि माईक बांधून छान पोडिअम बनविला होता. जेवणामध्ये झुणका भाकर (ज्वारी/बाजरी/तांदूळ/नाचणी), खारातील मिरची, तांदुळाची खीर, वांग्या-पावट्याची गावरान भाजी, वरण-भात तर नाश्त्याला केळीच्या पानात आंबोळी-घावणे आणि चटणी, सायंकाळी चहापानाला स्थानिक अल्पोहार मोंगा-पोपटी (शाकाहारी) असा अस्सल कोकणी ग्रामीण बेत होता. शेतामध्ये वारूळ पूजन, संत तुकारामांच्या स्पर्शाने पावन झालेला दगडी दिवाद्वारे दीपप्रज्वलन, ग्रामदेवतेला केलेलं स्थानिक बोलीतील गाऱ्हाणे (प्रार्थना), बोलीभाषेत लिहिलेलं संमेलन गीत, स्थानिक वाद्य ‘संबळ’ याचे वादन, मान्यवरांचा घोंगडी, मोरपीस, सन्मानचिन्ह, ग्रंथभेट देऊन केलेला सन्मान, प्लास्टिकचा वापर जाणीवपूर्वक टाळणं, पत्रावळीखाली योग्य आकाराचं ताट देण्याची कल्पना, टेबल खूर्ची यांना फाटा देऊन व्यासपीठावर म्हणजेच बांधावर गाद्या टाकून केलेली बैठक व्यवस्था, संमेलनाचा लोगो छापलेल्या उपस्थितांना ‘वानोळा’भेट देण्यात आलेल्या तागाच्या मजबूत पिशव्या, पारंपरिक सांस्कृतिक धरोहरांना दिलेला मान, रसिकांसाठी काजूच्या झाडांच्या सावलीतील व्यवस्था यांमुळे घरगुती ग्रामीण, कोकणी पद्धतीच्या व्यवस्थेने दिवसभर संपन्न झालेला हा साहित्य सोहळा उपस्थितांच्या मनात भरून राहिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button