
कोयना धरणात ८४.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक
एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाच्या तांत्रिक जल वर्षापैकी आठ महिन्यांचा कालावधी संपला असतानाही आता ऐन उन्हाळ्यातील मुख्य चार महिन्यांसाठी धरणात सध्या तब्बल ८४.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. आठ महिन्यांत १८४.४३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
एक जून रोजी नवीन जल वर्षारंभाला २३.१२ टीएमसी शिल्लक पाणीसाठ्यावर कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षाला सुरुवात झाली होती. आठ महिन्यात धरणातून पश्चिम वीजनिर्मितीसाठी २४.८२, सिंचनासाठी १२.९३, पूरकाळातील १४.५३ अशा ५२.२८ टीएमसी पाण्यावर वीजनिर्मिती करून तर ६४.६७ टीएमसी पाणी विनावापर व ६.०७ टीएमसी बाष्पीभवन असे ७०.७४ टीएमसी अशा एकूण १२३.०२ टीएमसी पाण्यानंतरही सध्या धरणात तब्बल ८४.१० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने भविष्यातील सिंचनासह वीजनिर्मितीची चिंता नाही. सिंचनासाठी आतापर्यंत १२.९३ टीएमसी पाणीवापर झाला आहे. वर्षभरात पश्चिम वीजनिर्मितीसाठी लवादाचा ६७.५० टीएमसी पाणीकोटा आरक्षित असतो. त्यापैकी आतापर्यंत २४.८२ टीएमसी पाणीवापर झाल्याने आगामी ऐन उन्हाळ्यात विजेंची सर्वाधिक मागणी असताना त्या काळातील चार महिन्यांसाठी ४२.६८ टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी आरक्षीत आहे.
www.konkantoday.com




