
रत्नागिरी शहरातील मांडवी नाका परिसरात उनाड गायीचा हल्ला; महिला गंभीर जखमी
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मांडवी नाका परिसरात शनिवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. हॉटेल शिवसमोर रस्त्यावर असलेल्या उनाड गायीने एका महिलेला तुडवून गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर सदर महिला रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत कोसळल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले व नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
परिसरातील एका सतर्क महिलेने तत्काळ मदतीस धाव घेत जखमी महिलेला रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर मांडवी नाका परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांत उनाड गुरांच्या हल्ल्याची ही चौथी-पाचवी घटना असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे विशेषतः महिला वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे वाहनचालकही भयभीत झाले असून, या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. अचानक रस्त्यावर येणाऱ्या गुरांमुळे अपघाताचा धोका वाढला असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
.




