
भाट्ये किनारा संरक्षक बंधार्याचे काम युद्धपातळीवर सुरू
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांची होणारी धूप थांबवण्यासाठी आणि किनारपट्टीवरील गावांना नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हाती घेतलेल्या ’कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पा’ची प्रभावी अंमलबजावणी आता प्रत्यक्ष धरातलावर दिसू लागली आहे. शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनार्यावर गेल्या आठवडाभरापासून संरक्षक बंधारा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या कामासाठी ८ कोटी ५६ लाख २९ हजार रुपयांचा भरीव निधी खर्च केला जात असून काळ्या दगडांच्या साहाय्याने ४८५ मीटर लांबीचा भक्कम बंधारा येथे उभारला जात आहे. किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने या कामाला मंजुरी दिल्यानंतर पत्तन विभागाने तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.
भाट्ये किनार्यावर सुरू असलेले हे काम कोकण आपत्ती सौम्यीकरण योजना २०२३ या एका व्यापक प्रकल्पाचा भाग आहे. गेल्या काही वर्षांत कोकण किनारपट्टीला निसर्ग आणि तौक्ते यांसारख्या मोठ्या चक्रीवादळांचा फटका बसला आहे. या वादळांमुळे आणि समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे किनारपट्टीची जमीन समुद्रात वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नारळ-सुपारीच्या बागा, स्थानिक कोळी बांधवांची घरे आणि पर्यटन स्थळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता, या योजनेअंतर्गत सुमारे ७८ कोटी रुपयांहून अधिक निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये आरे, नेवरे, गणपतीपुळे, गणेशगुळे, गावखडी आणि दापोली तालुक्यातील महत्त्वाच्या किनार्यांचा समावेश आहे. काही ठिकाणी काळ्या दगडांचे बंधारे, तर काही ठिकाणी पर्यावरणपूरक जिओ बॅग्स तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भाट्ये येथील कामामुळे रत्नागिरी शहरालगतच्या एका मोठ्या भागाला सुरक्षितता लाभणार असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही हे काम महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाळ्यातील उधाणापूर्वी बंधार्याचा पाया आणि मुख्य सांगाडा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पत्तन विभागाने समोर ठेवले आहे, जेणेकरून यंदाच्या पावसाळ्यात समुद्राच्या लाटांपासून किनार्याला होणारा धोका कमी होईल.
www.konkantoday.com




