
मतदान करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या परिवाराला मोठ्या गोंधळाचा सामना करावा लागला,एक तासाच्या धावपळीनंतर अखेर गणेश नाईक परिवाराचे मतदान पूर्ण
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान दिवशीच वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या परिवाराला मोठ्या गोंधळाचा सामना करावा लागला. सकाळी ७.३० वाजताच मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या गणेश नाईक आणि त्यांच्या परिवाराची मतदान केंद्राबाबत स्पष्ट माहिती न मिळाल्याने तब्बल एक तास धावपळ सुरू राहिली. अखेर एक तासानंतर गणेश नाईक, संजीव नाईक आणि सुन कल्पना नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावला. या सगळ्या धावपळीमुळे वनमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक यंत्रणेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून, निवडणूक यंत्रणा टू द पॉईंट काम करत नसल्याचे आरोप केले आहेत.
तब्बल ५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पार पाडत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या वनमंत्री गणेश यांची मोठी तारांबळ उडाली. सकाळी सुरुवातीला गेलेल्या दोन मतदान केंद्रांवर चौकशी करूनही गणेश नाईक व त्यांच्या परिवाराची नावे मतदार यादीत आढळली नाहीत. त्यामुळे मतदान केंद्र बदलले की मतदार यादीतच काही गोंधळ आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला. या दरम्यान नाईक परिवाराला वेगवेगळ्या केंद्रांवर चौकशी करत फिरावे लागले.
अखेर कोपरखैरणे येथील सेंट मेरी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर गणेश नाईक, संजीव नाईक आणि कल्पना नाईक यांची नावे यादीत असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर त्यांनी मतदान केले. मात्र याच ठिकाणी आणखी एक गोंधळ समोर आला. नाईक परिवारातील पुतणे आणि माजी महापौर सागर नाईक व त्यांच्या पत्नी यांची नावे एकाच मतदान केंद्रावर नोंदलेली नसून वेगळ्या ठिकाणी असल्याचे आढळले. त्यामुळे नेहमी एकाच मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या संपूर्ण नाईक परिवाराला यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करावे लागले.
गणेश नाईक व त्यांचा परिवार वर्षानुवर्षे कोपरखैरणेतील रा.फ. नाईक विद्यालयात मतदान करतात. मात्र, इतक्या वर्षांत पहिल्यांदाच मतदानाबाबत घोळ निर्माण झाल्याने या प्रकारावर संताप व्यक्त करताना गणेश नाईक यांनी निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर गंभीर आरोप केले. “यंत्रणा टू-द-पॉइंट काम करत नाही. मी मंत्री असूनही अशी स्थिती येत असेल, तर सर्वसामान्य मतदारांचे काय होत असेल,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली.




