
कोरोना काळात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या उद्धवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची निलेश राणे यांची मागणी
कोरोना काळात खिचडी घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या उद्धवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी केली आहे.पेडणेकर यांनी उमेदवारी अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवली असून त्याविरोधात कायदेशीर लढाईचे संकेत आमदार राणे यांनी दिले आहेत.
यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १९९ मधील उद्धवसेनेचे उमेदवार किशोरी पेडणेकर यांच्यावर २०२३ मध्ये दोन फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्या आता जामिनावर बाहेर आहेत. मात्र पेडणेकर यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्जात ही माहिती लपवली आहे. आरपीए १२५ ए कायद्यानुसार एखाद्या उमेदवाराने माहिती लपवली असल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार संबधित उमेदवाराची निवड रद्द करण्यात येते. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी रद्द व्हायला हवी, असे आमदार राणे म्हणाले.
पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती, मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना धमकी देऊन त्यांनी उमेदवारी मिळवली, असा दावाही निलेश राणे यांनी केला. कोविडमधील सगळं बाहेर काढेन, असे ठाकरेंना सांगून ब्लॅकमेल केलं आणि तिकीट मिळवलं, असेही निलेश राणे म्हणाले. एक गुन्हा बॉडीबॅग घोटाळ्याचा आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेने १६०० रुपये किमतीची बॉडीबॅग ६७१९ रुपयांना खरेदी केली. इन्फोटेक कंपनीकडून हजारो बॉडीबॅगची खरेदी केली आणि यातून मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप आमदार राणे यांनी केला.




