
ओळख महाभारताची भाग १३ धनंजय चितळे
महती महाभारताची
महाभारत ग्रंथाच्या आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की, या महाभारत ग्रंथात सर्व वेदांचे रहस्य तर आहेच, पण याशिवाय सांग उपनिषदांचा आणि वेदांचा विस्तार आहे.
इतिहास आणि पुराणांचा परिपोष तसेच भूतकाळातील गोष्टी, वर्तमानकाळातील घटना आणि भविष्यकाळातील घडामोडी इत्यादींचा उपयोग करून त्रिविधकालांचे निरूपण येथे करण्यात आले आहे. वार्धक्य, मृत्यू, भय, व्याधिभाव व अभाव यांचे निश्चित रूप येथे वर्णन केले आहे. अनेक प्रकारच्या धर्मांचे आणि ब्रह्मचर्यादी आश्रमांचे लक्षण, पृथ्वी, चंद्र, सूर्य, ग्रह, नक्षत्र, तारे यांचे प्रमाण, न्यायशास्त्र, शिक्षा ग्रंथ, कायचिकित्सा, दान, अनेक देशांचे वर्णन, नद्या, पर्वत, अरण्ये, सागर यांचेही वर्णन, युद्धामध्ये आवश्यक शस्त्रांच्या योजनांची माहिती आवश्यक विविध कौशल्यांचे चर्चा आणि जगात कसे वागावे हे सांगणारे नीतिशास्त्र यांचे प्रतिपादन या ग्रंथात आले आहे. म्हणूनच महाभारतकार म्हणतात,
धर्मे चार्थे च कामे च मोक्षे च भरतर्शभ |
यदिहास्ती तदन्यत्र यांनेहस्ती नतत्क्वचित ||(१.६२.५३)
अर्थात हे भरतश्रेष्ठ ! धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषांविषयी या ग्रंथात जे लिहिले आहे, तेच अन्य ठिकाणी आढळेल. पण जे यात नाही, ते कोठेही आढळणार नाही.
महाराष्ट्रातील थोर व्याख्याते विचारवंत बाळशास्त्री हरदास एके ठिकाणी म्हणतात, ”रामायणाने जीवनाचे ध्येयदर्शन घडवले असले तरी महाभारताने मानवी जीवनाची अपरिपूर्णता लक्षात घेऊन विषम परिस्थितीच्या गडद अंधकारातून ध्येयसिद्धीचा मार्ग दाखवला आहे.”
या महाभारताचे भारताबाहेरील वाङ्मयातही उल्लेख आढळतात. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून ग्रीक वाङ्मयात याचे उल्लेख आढळतात. सहाव्या शतकात कंबोडियाच्या देवळात संपूर्ण महाभारताचे वाचन होत असे, असा संदर्भ मिळतो. जावा बेटावरील लोकांनी महाभारताचे आपल्या भाषेत भाषांतर केल्याचा उल्लेखही आढळतो. इसवीसन १८१९ मध्ये फ्रान्समध्ये महाभारतातील नलोपाख्यानाचे इंग्लिश रूपांतर झाले. या भाषांतराला जगाच्या वाङ्मयातील एक देदीप्यमानल अलंकार म्हणून ओळखले जाते.
याचप्रमाणे डॉक्टर विटरनेट्स यांनी महाभारतातील विदुलेची वीरगाथा, द्रोणपर्वातील रात्री युद्धाचे वर्णन यावरही ग्रंथरचना केली. सत्यवान-सावित्री आख्यानाने तर तो वेडा झाला. भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी अनेक आक्रमकांनी आटोकाट प्रयत्न केले, पण भारतीय संस्कृतीने त्या आक्रमकांना गिळून टाकले आणि आपली महती कमी होऊ दिली नाही.
यामध्ये रामायण-महाभारत आणि भारतीय मनावर केलेले संस्कार खूप मोठे काम करून गेले आहेत. म्हणूनच आत्ताच्या नवीन पिढीला चांगले संस्कार द्यावयाचे असतील तर आपल्याला पुन्हा रामायण-महाभारताची कास धरावी लागेल. गेली अनेक वर्षे रत्नागिरीमध्ये कीर्तनसंध्येच्या माध्यमातून हे कार्य सुरू झालेच आहे. आता गरज आहे ती आपण प्रत्येकाने ‘ज्ञानदीप लावू जगी’ अशी प्रतिज्ञा करून हा ज्ञानाचा उजेड आधी स्वतःच्या घरी आणि मग घरोघरी लावण्यासाठी कार्यरत होण्याची. म्हणूनच समर्थ श्री रामदास स्वामींनी दिलेला
सामर्थ्य आहे चळवळीचे |
जो जो करील तयाचे |
परंतु तेथे भगवंताचे |
अधिष्ठान पाहिजे ||
हा संदेश आचरणात आणण्याचा निश्चय करू या. ‘केल्याने होत आहे रे’ हे श्री समर्थांनी दिलेले अभिवचन आहे, त्यावर श्रद्धा ठेवू या. ‘आधी केलेची पाहिजे’ असा निश्चय करू या आणि एका नवीन भारतीय वैचारिक युद्धाला सज्ज होऊ या.
(क्रमशः)




