रायगड जिल्हा हादरवून टाकणाऱ्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश , अवघ्या २६ तासांत रायगड पोलिसांनी हत्येतील मुख्य आरोपीना केली अटक


संपूर्ण रायगड जिल्हा हादरवून टाकणाऱ्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. अवघ्या २६ तासांत रायगड पोलिसांनी या हत्येतील मुख्य आरोपी सूत्रधार रवींद्र देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर या दोघांना अटक केली आहे.पोलिसांनी नागोठणे येथून दोघांना ताब्यात घेतलं. अत्यंत फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
८ टीम आणि २६ तासांचा थरार

मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींना पकडण्यासाठी खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट आणि रायगडच्या इतर संवेदनशील भागांत ८ वेगवेगळ्या तपास पथकांना पाठवण्यात आलं होतं. कालपासून ही सर्व पथके आरोपींच्या मागावर होती.
नागोठणे येथे थरारक कारवाई

आरोपी रवींद्र देवकर आणि दर्शन देवकर हे एका गाडीने पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी आपली गाडी आरोपीच्या गाडीसमोर आडवी घालून त्यांना घेराव घातला. पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन्ही मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या.
हत्येमागचे गूढ उकलणार?

मंगेश काळोखे यांची हत्या नक्की कोणत्या कारणातून करण्यात आली? यामागे काही जुना वाद होता की अन्य काही कारण? याचा तपास आता पोलीस कोठडीत सुरू होईल. मुख्य आरोपी ताब्यात आल्यामुळे या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
हत्येत माझा हात नाही- सुधाकर घारे

या प्रकरणी आरोप झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खोपोलीतील हत्या प्रकरणात माझा कोणताच हात नसून माझ्यावर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी जाणून बुजून आरोप केले आहेत, असा आरोप सुधाकर घारे यांनी केला आहे. मलाही या घटनेच वाईट वाटत असून मला या गोष्टीचं दुःख आहे. माझा नाव आणि आमच्यावर दबाव टाकण्यासाठी आमदार थोरवे यांनी पोलिसांवर दबाव टाकून दिल्याचा आरोप देखील घारे यांनी केला. मी स्वतःहून या घटनेसंदर्भात पोलिसांसमोर येऊन खुलासा करणार आहे. न्यायदेवतेवर आणि पोलीस प्रशासनावर माझा संपूर्ण विश्वास आहे. या प्रसंगात मी काळोखे कुटुंबांच्या दुःखात सहभागी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button