
लक्ष्मी ऑर्गेनिकची ’मिटेनी’शी तुलना दिशाभूल करणारी, कंपनी प्रवक्त्याचा दावा
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (एलओआयाएल) कामकाजाची माजी इटालियन कंपनी मिटेनी स्पा यांच्या कार्यपद्धतीशी करण्यात येणारी तुलना पूर्णतः चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, आमच्या माहितीनुसार, मिटेनीवरील मुख्य आरोप हा होता की, त्यांनी प्रक्रिया न केलेले सांडपाणी उघड्या जलस्रोतांमध्ये सोडले. याउलट एलओआयएलच्या लोटे येथील उत्पादन प्रक्रियेमध्ये क्लोज्ड-लूप प्रणालीचा वापर केला जातो, जी पर्यावरणात कोणतेही हानीकारक किंवा विषारी पदार्थ बाहेर पडू नयेत, यासाठी तयार केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या खुलाशानुसार, एलओआयएलच्या लोटे येथील प्रकल्पातून निघणारे सांडपाणी राज्य सरकारने मान्यता दिलेल्या सामायिक घातक कचरा प्रक्रिया, साठवणूक आणि विल्हेवाट सुविधेमध्ये पाठवले जाते, जिथे त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. एक जबाबदार आणि कायद्याचे पालन करणारी कंपनी म्हणून एलओआयएलचे लोटे येथील कामकाज सर्व लागू भारतीय कायदे आणि सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करते. एलओआयएल भारताच्या ’आत्मनिर्भर मारत दृष्टिकोनात एक जबाबदार भागीदार बनण्यास कटिबद्ध आहे आणि पर्यावरण, कामगारांची सुरक्षा आणि सामुदायिक आरोग्य यांना आमच्या व्यावसायिक कामकाजाचे मूलभूत आधारस्तंभ मानून त्यांना प्राधान्य देत असल्याचे कंपनीने अधोरेखित केले आहे.www.konkantoday.com




