
गुहागर-चिपळूण चालू बसमध्ये दारू पिणार्या एसटी चालक-वाहकाविरूद्ध गुन्हा दाखल
गुहागर-चिपळूण या चालू बसमध्ये दारू पिणे चालक-वाहकाला चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एसटी महामंडळाकडून कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
राजेंद्र मोहन गोडसे आणि संतोष महादेव हराळे (गुहागर आगार) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याची फिर्याद सहाय्यक वाहतूक निरीक्षक अरविंद राजेशिर्के यांनी दिली. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, गोडसे व हराळे हे दोघे १८ डिसेंबर रोजी आपल्या ताब्यातील गुहागर-चिपळूण ही बस घेऊन येत होते.
यावेळी प्रवासादरम्यान त्यांनी मद्यप्राशन केले. याची प्रवाशांनी तक्रारी करीत त्याचे व्हिडीओ बनवले. त्यामुळे एसटी प्रशासनामध्ये खळबळ उडाली. त्यानंतर राजेशिर्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या हे दोघेही रजेवर असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यांच्या केलेल्या तपासण्यांचे अद्याप अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. मात्र अहवाल आल्यावर निलंबित अथवा बडतर्फ अशी कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
www.konkantoday.com




