
खड्डे न बुजवता महामार्गाच्या साईटपट्टीला कॅटआय बसवण्याच्या कामाला मनसे वाहतूक संघटनेचा विरोध
चिपळूण-पाटण हा घाटमाथ्यावर जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्ता खड्ड्यांनी भरलेला असताना ते खड्डे न बुजवता महामार्गाच्या साईटपट्टीला कॅटआय बसवण्याचे काम सुरू केल्याने मनसेने तीव्र आक्षेप घेतला आहे. मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी पिंपळी येथे हे काम थांबवत ’प्रथम खड्डे भरा, नंतर इतर कामे करा, अन्यथा सरळ फटके देऊन वठणीवर आणू, असा आक्रमक इशारा महामार्ग विभागाच्या अधिकार्यांना दिला. मनसेच्या या पवित्र्यामुळे परजिल्ह्यातील ठेकेदाराने अखेर काम बंद केले.
चिपळूण-पाटण रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नुकताच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात आला आहे. मात्र ताबा घेतल्यानंतर महामार्ग विभागाने रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करत आपल्याला सोयीस्कर अशी कामे सुरू केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी पहिलाच दणका देत संबंधित कामाला विरोध केला.www.konkantoday.com



